भुयारी मार्ग आधी करा; मगच रेल्वे ट्रॅक ; निरा ग्रामस्थांची रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे मागणी | पुढारी

भुयारी मार्ग आधी करा; मगच रेल्वे ट्रॅक ; निरा ग्रामस्थांची रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे मागणी

निरा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मिरज लोहमार्गावरील निरा येथील रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील मस्जिद, लोकवस्ती व शेतीकडे जाण्या-येण्यासाठी प्रथम रेल्वेच्या हद्दीतून भुयारी मार्ग करावा, त्यानंतर रेल्वे ट्रॅकचे काम करावे, अशी मागणी निरा (ता. पुरंदर) ग्रामस्थांनी रेल्वेच्या डेप्युटी चीफ अभियंता यांच्याकडे केली आहे. निरा येथील रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे 125 वर्षांपासून मस्जिद, रहिवाशांची लोकवस्ती तसेच शेतकर्‍यांची निरा नदीकाठी शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी पिढ्यान् पिढ्यापासून रस्ता आहे. गेल्या दीड महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने नवीन रेल्वे ट्रॅकसाठी सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे.

मात्र, रेल्वे प्रशासनाने पूर्वीचा रस्ता बंद करून काम सुरू केले आहे. तसेच संबंधित रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्याच जागेत हद्द कायम करीत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव, रहिवासी व शेतकरी संतप्त झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. गुरुवारी (दि. 21) रेल्वेचे डेप्युटी चीफ इंजिनिअर मोहित सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर, शकील अहेमद शेख, राजेंद्र कुलकर्णी यांनी रेल्वे ट्रॅकची पाहणी करून संबंधित रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी रेल्वेच्या हद्दीतून पहिल्यांदा भुयारी मार्ग काढा; नंतरच रेल्वे ट्रॅक करा, अशी मागणी केली. तसेच पिंपरेखुर्द येथून रेल्वेच्या हद्दीतून निरा नदीपर्यंत होत असलेला रस्ता तातडीने रेल्वेच्या हद्दीतून करण्याची मागणी केली.

ग्रा. पं. सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे यांनी जुन्या नकाशातील रस्ता पुराव्यानिशी दाखवून रेल्वेच्या हद्दीतून भुयारी मार्ग काढण्याची मागणी केली. या वेळी हाजी सद्रुद्दीन शेख, अनंता शिंदे, योगेंद्र माने, दयानंद चव्हाण, सिकंदर शेख, नदीम सय्यद, मुन्ना डांगे, अमीर पठाण, जलील काझी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, निरा ग्रामस्थांच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत मोहित सिंग व साळुंखे यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

Back to top button