South Africa vs India : भारताचा मालिका विजय | पुढारी

South Africa vs India : भारताचा मालिका विजय

पार्ल, वृत्तसंस्था : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने (South Africa vs India) दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा मालिका विजय मिळवला. आतापर्यंतच्या इतिहासात भारताने दक्षिण आफ्रिकेत केवळ दुसर्‍यांदा वन-डे मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारताला 2018 साली येथे मालिका जिंकता आली होती. पार्लच्या बोलँड पार्क मैदानावर झालेला तिसरा सामना भारताने 78 धावांनी जिंकला.

संजू सॅमसनचे (114 चेंडूंत 108) शतक, तिलक वर्माचे अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसर्‍या वन-डे सामन्यात 50 षटकांत 8 बाद 296 धावा केल्या. त्यानंतर अर्शदीप सिंगच्या 4 विकेटस्च्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 218 धावांत रोखलेे. टोनी डी. झोर्जीच्या 81 धावा यजमान संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. शतकवीर संजू सॅमसनला सामनावीर, तर अर्शदीप सिंगला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

भारताच्या जवळपास तीनशे धावांच्या आव्हानाचा मुकाबला करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली. रिझा हेंड्रिक्स आणि टोनी डी. झोर्जी यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पॉवरप्लेमध्येच अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून देताना हेंड्रिक्सला (19) बाद केले. पाठोपाठ अक्षर पटेलने रॅसी व्हॅन डेर डुसेन (2) याचा त्रिफळा उडवला. यानंतर गेल्या सामन्यातील शतकवीर टोनी डी. झोर्जीच्या साथीला कर्णधार एडन मार्कराम आला. दोघांनी संयमी फलंदाजी करताना धावफलक हलता राहील, याची काळजी घेतली. वॉशिंग्टन सुंदरने ही जमलेली जोडी फोडून भारताला मोठा दिलासा मिळवून दिला. मार्करामने 36 धावा केल्या. यानंतर सलग दुसर्‍या शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या टोनी डी. झोर्जीला अर्शदीपने पायचित केले. पंचांनी नाबाद दिलेला टोनी अर्शदीपच्या आग्रहाखातर घेतलेल्या ‘डीआरएस’मध्ये बाद ठरला. त्याने 81 धावा करताना 6 चौकार आणि 3 षटकार मारले. यष्टिरक्षक-फलंदाज हेन्रिक क्लासेनला (21) आवेश खानने बाद केले. वन-डे मालिकेत आपला पहिला बळी टिपताना मुकेश कुमारने धोकादायक डेव्हिड मिलरला (10) बाद केले. अर्शदीपने केशव महाराजच्या रूपाने आपली तिसरी विकेटस् घेतली. अर्शदीपनेच लिझार्ड विल्यम्सला बाद करून आपल्या विकेटस्ची संख्या 4 केली. आवेश खानने बी. हेंड्रिक्सला बाद करून भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, बोलँड पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली, तर फिरकीपटू कुलदीप यादवलादेखील विश्रांती देण्यात आली असून, त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे तिसर्‍या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे रजत पाटीदार याला पदार्पणाची कॅप मिळाली. तो आणि साई सुदर्शन सलामीला आले. या दोघांनी 4.4 षटकांत 34 धावा फलकावर चढवल्या. परंतु, नांद्रे बर्गरने पहिला धक्का दिला. पदार्पण करणार्‍या रजत पाटीदारला त्याने बाद केले. रजतने आक्रमक सुरुवात करताना 16 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 22 धावा केल्या.

भारताचा दुसरा सलामीवीर साई सुदर्शन 10 धावा करून बाद झाला. त्याला हेंड्रिक्सने पायचित पकडले. त्यानंतर के. एल. राहुल आणि संजू सॅमसन यांनी तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली होती. मात्र, ही जोडी विआन मुलरने फोडली. त्याने के. एल. राहुलला 21 धावांवर बाद केले. के. एल. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या तिलक वर्माने संथ फलंदाजी केली. दरम्यान, संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. जवळपास 30 चेंडू खेळून 7 धावा करणार्‍या तिलकनेही नंतर आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. त्यानंतर संजू सॅमसनने शतकी खेळी केली. त्याने कारकिर्दीतील आपले पहिले शतक ठोकले. मात्र, 114 चेंडूंत 108 धावा करून तो बाद झाला. यानंतर रिंकू सिंगने 27 चेंडूंत 38 धावा करून भारताच्या डावाला आकार दिला. भारताने 50 षटकांत 8 बाद 296 धावा केल्या.

पदार्पणामुळे रजतला 20 लाखांचा फायदा (South Africa vs India)

सामन्यात रजतने पदार्पण केले आणि ‘आयपीएल’च्या नव्या नियमाचा लाभार्थी घेणारा पहिला खेळाडू ठरला. 30 वर्षीय रजतला ‘बीसीसीआय’च्या नव्या नियमानुसार आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 30 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार ‘आयपीएल’च्या दोन पर्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या खेळाडूला आता रिवॉर्ड मिळणार आहे. आधीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला फ्रँचायझीने खरेदी केल्यास त्याची फी ही 3 वर्षांसाठी तेवढीच राहते किंवा त्याला रीलिज केल्यानंतर अन्य फ्रँचायझीने घेतल्यावर त्यात वाढ होते; पण आता अनकॅप खेळाडूची रक्कम 50 लाखांपर्यंत वाढू शकते. जर अनकॅप खेळाडू ‘आयपीएल’च्या दोन पर्वांमध्ये 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळला, तर त्याची फी दुप्पट होते. ‘आरसीबी’ने लिलावात 20 लाखांत रजतला करारबद्ध केले होते. परंतु, त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आणि आता त्याची फी 50 लाख होणार आहे.

जखमी ऋतुराज कसोटीला मुकणार?

ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे तिसर्‍या सामन्यातून माघार घ्यावी लागली. पहिल्या दोन वन-डे सामन्यांत ऋतुराजला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यात त्याला दुसर्‍या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. ऋतुराज भारताच्या कसोटी संघाचाही सदस्य आहे आणि त्याची दुखापत टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. तो कसोटी संघात खेळेल की नाही, अशी शंका उपस्थित झाली आहे. ‘बीसीसीआय’ने ट्विट केले की, दुसर्‍या वन-डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यातून तो पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे तो ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे. 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या 5 दिवसांत ऋतुराज बरा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहे.

Back to top button