Leopard News : अखेर ‘ते’ बछडे सुखरूप आईच्या कुशीत | पुढारी

Leopard News : अखेर ‘ते’ बछडे सुखरूप आईच्या कुशीत

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नागापूर (ता. आंबेगाव) येथील निकम-पोहकरमळ्यात ऊसतोड सुरू असताना आढळलेले तीन बिबट बछडे पुन्हा आई मादीच्या कुशीत दुपारी विसावले. ही घटना ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाली आहे. नागापूर गावठाणालगत निकम-पोहकर मळा आहे. तेथे हनुमंत आनंदा पोहकर यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. सोमवारी ऊसतोड सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऊसतोड मजुरांना एक बिबट बछडा आढळून आला. त्यामुळे कामगारांमध्ये घबराट पसरली.

त्यांनी ऊसतोडीचे काम त्वरित थांबवले. त्यानंतर शेतकरी हनुमंत पोहकर यांनी वनविभागाला ही घटना सांगितली. दरम्यान निकम-पोहकरमळ्यात वनविभागाने शोध मोहिम राबवीली असता हनुमंत आनंदा पोहकर यांच्या शेतात सोमवारी (दि. 18) सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वन विभाग व रेस्क्यू पथकाने ते बछडे ताब्यात घेत त्यांची आई मादीच्या कुशीत पाठविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार तीनही बछड्यांना पुन्हा दुपारी त्याच शेतात नेण्यात आले. तेथे ट्रॅप कॅमेरा बसविला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बछड्यांची आई मादी तेथे आली आणि तिने तीनही बछड्यांना उचलून तेथून सुरक्षित ठिकाणी नेले.

बछडे काही तास अवसरी वन उद्यानात

वनविभागाने तीनही बिबट बछड्यांना अवसरी वन उद्यानात सुखरूपपणे ठेवले आहे. सोमवारी (दि. 18) सायंकाळी पुन्हा हे बछडे मादीच्या कुशीत सोडले जाणार असल्याचे वनपाल प्रदीप कासारे यांनी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी वनविभागाची मोहिम फत्ते झाली.

हेही वाचा

Back to top button