नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी एकजुटीने आवाज उठवावा. यासाठी सर्व खासदारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि आरक्षणासाठी पत्र लिहावे, असा निर्धार आज दिल्लीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील सर्वपक्षीय बैठकीमध्ये व्यक्त झाला. आरक्षणासाठीचे निकष बदलावेत आणि मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 48 टक्क्यांऐवजी 100 टक्क्यांपैकी गणले जावे, अशा मागणीचे दोन ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आले.
माजी खासदार संभाजीराजे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला, खासदार उदयनराजे यांच्यासह केंद्रात व राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आवर्जुन उपस्थित होते. मात्र, महाविकास आघाडीतील खासदारांची मात्र ठळक अनुपस्थिती बैठकीत दिसून आली. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि पत्र द्यावे, असे बैठकीत ठरल्याचे निमंत्रक संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याआधीही मराठा आरक्षण प्रकरणी पंतप्रधानांची भेट मागितली होती. तेव्हा ती मिळाली नव्हती. आता वेळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.
महाराष्ट्र सदनात झालेल्या या बैठकीला भाजपच्या वतिने केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, खासदार उदयनराजे भोसले, उन्मेश पाटील, प्रतापराव चिखलीकर, रणजीत निंबाळकर, धनंजय महाडिक, सुधाकर शृंगारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल तसेच शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, संजय मंडलिक, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने आणि ठाकरे गटाचे एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.