मावळातील ‘जलजीवन’वरून अधिवेशनात खडाजंगी | पुढारी

मावळातील ‘जलजीवन’वरून अधिवेशनात खडाजंगी

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे निकृष्ट दर्जाचे काम व त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचार याबाबत आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा थर्ड पार्टी ऑडिट करणार का व कधी करणार? असा जाब पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारला. दरम्यान, या मुद्द्यावरून मंत्री पाटील व आमदार शेळके यांच्यात चांगलीच चकमक रंगल्याचे पहावयास मिळाले.

थर्ड पार्टी ऑडिट करा

आमदार शेळके यांनी आक्रमक भूमिका घेऊन जाब विचारल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे या मुद्द्यावरून दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक झाल्याचे पहावयास मिळाले. अखेर आमदार शेळके यांनी तक्रार असलेल्या योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करणार का? ते किती दिवसांत करणार? असा सवाल केला. तर, मंत्री पाटील यांनी तुमची तक्रार आल्यावर तात्काळ थर्ड पार्टी ऑडिट करू, असे सांगितले. त्यानंतर दोघांमधील चकमक थांबली.

87 योजनांच्या कामांची मुदत संपली

  •  केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून राबविण्यात येणार्‍या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मावळ तालुक्यात 114 पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू असून, यापैकी फक्त 27 योजनांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 87 योजनांचे काम मुदत संपूनही अत्यंत दिरंगाईने सुरू असून जे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत आमदार शेळके यांनी 11 डिसेंबर रोजी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली होती व आज पुन्हा हाच मुद्दा उपस्थित करून थर्ड पार्टी ऑडिट कधी करणार, असा जाब विचारला.
  •  एकंदर, आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करून मावळ तालुक्यासाठी तब्बल 114 पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्या. परंतु, त्या निकृष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक दिरंगाई करत सुरू असून याकामात भ्रष्टाचारही झाला असल्याने आमदार शेळके हे आक्रमक झाले असून हा मुद्दा थेट अधिवेशनात गाजल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Back to top button