संपूर्ण वळसे-पाटील कुटुंब ‘ऑन फिल्ड’ | पुढारी

संपूर्ण वळसे-पाटील कुटुंब ‘ऑन फिल्ड’

सुषमा नेहरकर :

शिवनेरी : गेल्या दोन -तीन महिन्यांपासून सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे संपूर्ण कुटुंब आंबेगाव-शिरूर मतदारसंघात ‘ऑन फिल्ड’ दिसत आहे. स्वतः वळसे-पाटील यांच्यासह पत्नी व अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण वळसे-पाटील, मुलगी पूर्वा सतत मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेणे, विविध कार्यक्रम, दशक्रिया, पूजा, जत्रा-यात्रांना भेटी देताना दिसत आहेत. सध्या राज्यासह आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय घडामोडींची धास्ती घेऊन, की मतदारसंघातील लोकांप्रती असलेला जिव्हाळा वळसे-पाटील कुटुंबाला मतदारसंघात ठिय्या मारून बसायला भाग पाडत असल्याची चर्चा मतदार संघात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका-पुतण्याचे राजकारण वेगवेगळे झाल्याने संपूर्ण राज्यातच स्थानिक पातळीवर या राजकारणाचे पडसाद उमटत आहेत. बारामतीनंतर राज्यात सर्वाधिक धक्का आंबेगाव तालुक्यात बसला. शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असे दिलीप वळसे-पाटील हेच अजित पवार गटात सामील झाले. त्याच वेळी तालुक्याच्या राजकारणात दिलीप वळसे-पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये सहभागी झाले, एवढेच नाही तर शरद पवार यांनी निकम यांना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली. या सर्व राजकीय परिस्थितीची धास्ती दिलीप वळसे-पाटील कुटुंबाने घेतली की काय, अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे.

गेल्या दोन -तीन महिन्यांपासून दिलीप वळसे-पाटील बहुतेक सर्व ’विकेंड’ला आपल्या मतदारसंघात दिसत आहेत. आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुस-याच दिवशी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणारे, शेतकर्‍यांना दिलासा देणारे दिलीप वळसे-पाटील राज्यातील पहिले मंत्री होते. या शिवाय आपल्या मंचर येथील कार्यालयात बसून लोकांच्या अडचणी, समस्या समजून घेणे व तातडीने मार्ग काढताना देखील वळसे-पाटील दिसत आहेत.

आंबेगाव तालुक्यात महिलांच्या उन्नतीमध्ये अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मोठे योगदान आहे. या संस्थेच्या माध्यमातून सध्या किरण दिलीप वळसे-पाटील मतदारसंघात विविध कार्यक्रम घेणे, गावोगावी जाऊन महिलांचे, लोकांचे प्रश्न समजावून घेत आहेत. पूर्वा वळसे-पाटील देखील गेल्या काही महिन्यांत मतदारसंघात एकदमच अ‍ॅक्टिव्ह झाल्या असून, युवा मेळावे, अवकाळीग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना दिलासा देणे, गावोगावी जाऊन ‘नवे पर्व नवा ध्यास’ टॅगलाईन घेऊन ज्येष्ठांचे आशिर्वाद घेत आहेत. कीर्तन सोहळा, विविध सामाजिक कार्यक्रमांना पूर्वा वळसे-पाटील आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत. सहकारमंत्रीपद व बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना मतदारसंघातील वळसे-पाटील यांची अनुपस्थिती सध्या किरण वळसे-पाटील व पूर्वा वळसे-पाटील भरून काढताना दिसत आहेत.

हेही वाचा :

Back to top button