Shreyas Iyer KKR Captain : श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार, नीतीश राणा उपकर्णधार | पुढारी

Shreyas Iyer KKR Captain : श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार, नीतीश राणा उपकर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer KKR Captain : आयपीएल 2024 ची तयारी वेगाने सुरू आहे. अगामी हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी दुबई येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने श्रेयस अय्यरला पुन्हा कर्णधार बनवले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या हंगामात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणाकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

नीतीश राणा उपकर्णधार

केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी अय्यरच्या कर्णधारपदी पुनरागमनाची पुष्टी केली, ते म्हणाले, ‘अय्यर दुखापतीमुळे 2023 च्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे. पण 2024 च्या हंगामासाठी तो परतला आहे. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून याचा आम्हाला आनंद आहे. नीतीश राणाने गेल्या आयपीएलमध्ये अय्यरची जागा घेण्यास सहमती दर्शवली होती त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तो यंदा अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.’

श्रेयस अय्यर म्हणाला… (Shreyas Iyer KKR Captain)

श्रेयस अय्यरनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘मला विश्वास आहे की गेल्या हंगामात आम्ही अनेक आव्हानांचा सामना केला. दुखापतीमुळे मला खेळता आले नाही. अशा काळात नितीशने सक्षम नेतृत्व केले. 2024 च्या हंगामासाठी केकेआरने त्याला उपकर्णधार बनवले याचा मला आनंद आहे. यामुळे नेतृत्वगट मजबूत होईल यात शंका नाही.’

अय्यरचे आयपीएल करियर

श्रेयस अय्यरने आयपीएल 2022 मध्ये केकेआरसाठी 14 सामन्यांमध्ये 30.85 च्या सरासरीने आणि 134.56 च्या स्ट्राइक रेटने 401 धावा केल्या. एकूण आयपीएल कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 101 सामन्यांमध्ये 31.55 च्या सरासरीने 2,776 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 आहे. अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 19 अर्धशतके झळकावली आहेत. (Shreyas Iyer KKR Captain)

2023 च्या आयपीएलमध्ये केकेआरची निराशाजनक कामगिरी

2023 च्या आयपीएलमध्ये राणाच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ प्ले-ऑफमध्येही पोहोचू शकला नाही. त्या हंगामात केकेआरने 14 पैकी 6 सामने जिंकले आणि 8 गमावले. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत 7व्या स्थानावर राहिला. कर्णधार राणाने आयपीएल 2023 मध्ये जवळपास 32 च्या सरासरीने आणि 141 च्या स्ट्राइक रेटने 413 धावा केल्या. ज्यात 3 अर्धशतकांचाही समावेश होता.

असा आहे केकेआरचा संघ

नुकतेच केकेआरने 12 खेळाडूंना रिलीज केले. त्यानंतर उरलेल्या संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, वैभव अरोरा आणि सुयश शर्मा यांचा समावेश आहे. दुबईतील लिलावादरम्यान शाहरुख खानची ही फ्रँचायझी कोणत्या नव्या खेळाडूंना विकत घेईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संघाकडे अजून 32.7 कोटी रुपये शिल्लक आहेत.

 

Back to top button