सोलापूर : बाजार समिती शेतकर्‍यांच्या मुळावर | पुढारी

सोलापूर : बाजार समिती शेतकर्‍यांच्या मुळावर

संतोष सिरसट

सोलापूर : शेतकर्‍यांसाठी बाजार समितीची निर्मिती केली आहे, मात्र तीच बाजार समिती शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दिवसाआड कांद्याचे लिलाव बंद ठेऊन शेतकर्‍यांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत संचालक मंडळ, जिल्हा उपनिबंधक, राज्य सरकार मूग गिळून गप्प आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, मात्र त्याचे लोडिंग व अनलोडिंग करणे एका दिवसात शक्य होत नसल्याचे कारण देत बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्याची नवीन प्रथा बाजार समितीने पाडली आहे. त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना होत आहे.

बाजार समितीमध्ये दोन ते चार हजार शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत, मात्र त्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. बाजार समिती एक दिवसाआड कांद्याचे लिलाव बंद ठेऊन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहे. याकडे बाजार समितीचे सभापती आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ पूर्णपणे डोळेझाक करत आहे. संचालक मंडळाच्या दुर्लक्षाचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. सरकारच्या मतांवर निवडून आलेले संचालक मंडळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडेच दुर्लक्ष करत आहे.

पदाधिकारी-अडत्यांची मिलीभगत

बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून चाललेल्या लिलाव बंदच्या भूमिकेकडे संचालक मंडळासह पदाधिकार्‍यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ व अडत्यांची मिलिभगत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांसह कांदा उत्पादकांनी केला आहे.

बाजार समितीने कांदा लिलाव बंद ठेऊन शेतकर्‍यांना वेठीस धरणे योग्य नाही. याकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. कांद्याची आवक जास्त होणार हे माहीत असतानाही बाजार समिती त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.
– सयाजी गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी

Back to top button