निष्‍कारण मृत्‍यूला कवटाळू नका, तत्‍काळ शरणागती पत्‍करा : इस्रायलच्‍या पंतप्रधानांचे हमासला आवाहन | पुढारी

निष्‍कारण मृत्‍यूला कवटाळू नका, तत्‍काळ शरणागती पत्‍करा : इस्रायलच्‍या पंतप्रधानांचे हमासला आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युद्ध अजूनही सुरु आहे; परंतु ही हमासच्या समाप्तीची सुरुवात आहे. तत्‍काळ शरणागती पत्‍करा, निष्‍कारण मृत्‍यूला कवटाळू नका, असे आवाहन इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्‍टाईनमधील दहशतवादी संघटना हमासला केले आहे. विशेष म्‍हणजे इस्‍त्रायल-हमास युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाल्‍यानंतर नेतन्याहू यांनी हे आवाहन केले आहे.

इस्‍त्रायली सैन्‍याने दक्षिण गाझामध्‍ये निर्णायक यश मिळवले आहे. यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी निवेदनात म्‍हटले आहे की, युद्ध अजूनही सुरु आहे; परंतु ही हमासच्या समाप्तीची सुरुवात आहे. त्‍यामुळे हमासने शरणागती पत्‍करावी. दरम्‍यान, हमासने रविवारी इस्रायलला धमकी दिली होती की, मागण्या पूर्ण झाल्‍या नाही तर ताब्‍यात असणारे एकही ओलीस जिवंत सोडणार नाही.

आमच्‍या मागण्‍या मान्‍य केल्‍या नाहीत तर उर्वरीत ओलीस जिवंत राहणार नाहीत, अशी धमकी हमासचा प्रवक्ता अबू ओबेदा याने दिली आहे. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्‍त्रायलवर भीषण हल्‍ला केला. यानंतर इस्रायलनेही त्‍याला सडेतोड प्रत्‍युत्तर दिले. आतापर्यंत या रक्‍तरंजित संघर्षात १७ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 48,780 जखमी झाले आहेत. तर युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये सुमारे १२०० हून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत.

ओलिसांच्‍या सुटकेसाठी सहा दिवसांच्‍या युद्धविरामानंतर पुन्‍हा हल्‍ले आणि प्रतिहल्‍ले सुरु झाले आहेत. इस्त्रायलीने गाझा शहरातील कारवाई सुरुच ठेवली आहे. इस्रायलने दक्षिण गाझाच्या मुख्य शहर खान युनिसपर्यंतचा भाग आपल्‍या ताब्‍यात घेतला आहे. तसेच गाझा शहरातचा पश्चिम भागावर हवाई हल्‍ले केले.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button