Pune News : दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचा कावड मोर्चा | पुढारी

Pune News : दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचा कावड मोर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना गाईच्या दुधाला 40 आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी कावड मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली लाल महाल ते कुमठेकर रस्त्यावरील दुग्ध विकास अधिकारी कार्यालय असा हा मोर्चा मार्गस्थ झाला. यामध्ये दूध उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

मोर्चादरम्यान राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. खोत म्हणाले की, यंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने शेतकरी वर्गासमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्याअनुषंगाने विविध माध्यमांतून राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकर्‍यांना दूध उत्पादनामधून काही उत्पन्न मिळण्यास मदत होते. मात्र, मागील काही वर्षांत दुधाच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ झाली नाही. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून गाईच्या दुधाला 40 आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर द्यावा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहे.

राज्यात गाईच्या दुधाला 25 ते 26 रुपये लिटर भाव मिळत आहे. तर शहरात ग्राहकाला तेच दूध 60 रुपये लिटर दराने विकत घ्यावे लागत आहे. राज्यातील शेतकरी यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये शेतकर्‍यांना अनुदान मंजूर केलं होतं ते पुन्हा लागू होण्याची आवश्यकता आहे. आमच्या मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढला असून मागण्यांची दखल राज्य सरकारने न घेतल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खोत यांनी या वेळी दिला.

हेही वाचा

Back to top button