महिलांवरील अत्याचारांमध्ये युपी पुढे; महाराष्ट्र दुसरा | पुढारी

महिलांवरील अत्याचारांमध्ये युपी पुढे; महाराष्ट्र दुसरा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुंबईसह राज्य आणि देशभरात मुली, महिलांवरील अत्याचारासह घडणार्‍या अन्य गुन्ह्यांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवसच वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या 2022 च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2022 या वर्षात देशात महिलांविरुद्ध एकूण चार लाख 45 हजार 256 गुन्ह्यांची नोंद झाली. 2021 साली हा आकडा चार लाख 28 हजार 278 एवढा होता. महिलांसंबंधी गुन्ह्यांत उत्तर प्रदेशात सर्वाधिक 65 हजार 743 गुन्हे नोंदवले गेले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये 45 हजार 331 आणि राजस्थानमध्ये 45 हजार 58 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी महिलांवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान आघाडीवर असून तेथे 5 हजार 399 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 3 हजार 390, मध्य प्रदेशमध्ये 3 हजार 29 आणि महाराष्ट्रात 2 हजार 904 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बलात्कार/सामूहिक बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येचे सर्वाधिक गुन्हे हे उत्तर प्रदेश (62), मध्य प्रदेश (41) आणि महाराष्ट्र (22) झाले आहेत. सिड हल्ल्याच्या गुन्ह्यामध्ये पश्चिम बंगाल (31), उत्तर प्रदेश (23) आणि महाराष्ट्र (9) गुन्हे दाखल झाले आहेत.

विनयभंगाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र आघाडीवर

महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात 11 हजार 512 गुन्हे दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशात 10 हजार 548 विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 7 हजार 955 आणि महाराष्ट्रात 7 हजार 467 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Back to top button