Crime News : मध्य प्रदेशातून आणली चार पिस्तुले; चौघांना अटक | पुढारी

Crime News : मध्य प्रदेशातून आणली चार पिस्तुले; चौघांना अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीच्या वादातून एकाने मध्य प्रदेश येथून चार पिस्तुले आणि दहा काडतुसे आणली. यातील दोन पिस्तूल त्याने मित्र आणि नातेवाइकाला दिले. दरम्यान, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चौघांना अटक केली आहे. हरीश काका भिंगारे (34, रा. औंध रोड आंबेडकरनगर चंद्रमणी संघ पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (30, रा. समर्थनगर, नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (30, रा. पाषाण पुणे), अरविंद अशोक कांबळे (42, रा. पौड, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण पीडब्ल्यूडी मैदानाजवळ आला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी हरिष भिंगारे, आरोपी गणेश कोतवाल यांना ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीमध्ये कंबरेला दोन पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशीत आरोपींनी मागील सहा-सात महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश येथे जाऊन एकूण चार पिस्तुले खरेदी करून आणल्याचे समोर आले.

आरोपींनी दोन पिस्तूल पाषाण पुणे येथील त्यांचा मित्र आणि एक पिस्तूल येथील नातेवाइकाला दिल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी पाषाण येथून आरोपी शुभम पोखरकर यास तर पौड येथून आरोपी अरविंद कांबळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तूल जप्त केले आहेत.

यांनी केली कामगिरी

पोलिस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) सतीश माने, सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, नामदेव कापसे, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी ही कारवाई केली.

आरोपी हरिश भिंगारे हा मूळचा मुळशी तालुक्यातील उरावडे आंबेगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान, त्याच्या शेतजमिनीच्या हक्काबाबत वाद सुरू आहे. आरोपी हरिश भिंगारे आणि गणेश कोतवाल हे दोघेही मित्र आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या सीमा भागात जाऊन चार पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली. यातील दोन पिस्तुले त्यांनी स्वत:जवळ ठेवून दोन आरोपी शुभम पोखरकर, आरोपी अरविंद कांबळे यांच्याकडे दिले.

हेही वाचा

Back to top button