बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील कसबा येथील स्थलांतरित बसस्थानकावरून महिलेच्या पर्समधील एक हजाराची रोकड आणि 72 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. गेला महिनाभर बस स्थानकावर चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून, पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात सुचिता विनोद क्षीरसागर (रा. आनंदघन सोसायटी, जंक्शन, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुचिता क्षीरसागर ह्या सासरहून परत येत होत्या. बसमध्ये बसण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडील दागिने व रोकड पर्समध्ये ठेवली. दुपारी एकच्या सुमारास त्या बारामती बस स्थानकावर पोहचल्या. त्या इंदापूर बसमध्ये बसत असताना प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्यांनी पर्स पुढे घेतली. त्या वेळी पर्सची चैन उघडी दिसली. त्यांनी पर्स तपासली असता त्यामधील सोन्याचा लक्ष्मी हार, ठुशी व एक हजाराची रोकड लंपास झाल्याचे दिसले.
संबंधित बातम्या :
त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. चालक-वाहकाला कल्पना दिली. गर्दीत त्यांच्या मागे दोन महिला होत्या. त्या तेथून पसार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिस आल्यावर त्यांनीही शोध घेतला. परंतु, या दोन महिला बस स्थानकावर दिसल्या नाहीत.
एकाही प्रकरणाचा तपास लागेना
बारामती बस स्थानकावर दिवाळीपासून चोरट्यांचा उच्छाद सुरूच आहे. बसने प्रवास करणार्या महिलांकडील दागिने लंपास केले जात आहेत. विशेष म्हणजे, यातील एकाही प्रकरणाचा अद्याप पोलिसांकडून तपास लागलेला नाही. त्यामुळे महिलांसह अन्य प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.