पिंपरी : बंदी असलेल्या फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. यातच आता तरुणांमध्ये 'शटर' नंबर प्लेटची क्रेज वाढू लागली आहे. फॅन्सीपेक्षा घातक असलेल्या या नंबर प्लेटमुळे भविष्यात पोलिस तपासात मोठ्या अडचणी येऊ शकतात; तसेच गुन्हेगार याचा फायदा घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहर परिसरात विक्री होत असलेल्या शटर नंबरप्लेटवर तत्काळ बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
'पुढारी' प्रतिनिधीने शहर परिसरातील शटर नंबर प्लेट विक्रेत्याला फोन केला. शटर नंबर प्लेट माहिती घेतल्यानंतर त्याला वाहतूक नियम आणि पोलिसांच्या कारवाईबाबत विचारण्यात आले. त्यावर संबंधित व्यावसायिकाने 'पोलिसांचे तुमचे तुम्ही बघा' असे स्पष्टीकरण दिले; तसेच अजून तरी पोलिसांचा काहीही त्रास नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहतूक पोलिस शटर नंबर प्लेटबाबत अनभिज्ञ असल्याचे अधोरेखित होत आहे.
गुन्हा केल्यानंतर एखादी कार नाकाबंदी ओलांडून रात्रीच्या वेळी न थांबता वेगाने जाते. त्या वेळी कारचा तपशील घेण्यासाठी, अधिकारी कारचा रंग आणि नोंदणी क्रमांक पाहण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळी रंग स्पष्टपणे ओळखता येत नाही. त्या वेळी संबंधित चालकाने नंबर प्लेटचे शटर बंद केल्यास पोलिसांना माग काढणे शक्य होणार नाही. शटर नंबर प्लेटचा फायदा गुन्हेगार घेण्याची दाट शक्यता आहे. अपहरण, खून, विनयभंग, चेन किंवा मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा नोंदणी क्रमांक पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. याव्यतिरिक्त आडमुठ्या चालकांना सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे होणार्या दंडात्मक कारवाईलादेखील हुलकावणी देणे जमणार आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच पाऊले उचलून 'शटर' नंबर प्लेट बसवणार्या व्यावसायिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
शटर नंबर प्लेटची ऑनलाईन विक्री जोरात सुरू आहे. याव्यतिरिक्त शहर परिसरातील काही दुकानांमध्येदेखील याची 8 ते 10 हजारांपर्यंत विक्री केली जाते. फिटिंग चार्जेसचादेखील यामध्ये समावेश आहे. या नंबर प्लेट 'युनिव्हर्सल' म्हणजेच कोणत्याही वाहनांना बसतील अशा पद्धतीने बनवण्यात आल्या आहेत.
शटर नंबर प्लेट ही सामान्य नंबर प्लेटप्रमाणेच दिसणारी प्लेट आहे; मात्र या प्लेटच्या वरच्या बाजूस काळ्या रंगाचे शटर आहे. या शटरला नियंत्रित करण्यासाठी चालकच्या केबिनमध्ये एक रिमोट दिला जातो. त्यावरून चालक आपल्या इच्छेनुसार शटर उघड-झाप करू शकतो. शटर बंद केल्यानंतर ही नंबर प्लेट पूर्णपणे
झाकली जाते.
शटर नंबर प्लेटची क्रेझ गेल्या काही महिन्यांपासून वाढली आहे. यापूर्वी या नंबर प्लेटची केवळ ऑनलाईन विक्री केली जात होती; मात्र ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे शहर परिसरातील काही व्यावसायिकांनी शटर नंबर प्लेट उपलब्ध केल्या आहेत. यातील विशेष बाब म्हणजे या नंबर प्लेटबाबत सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे
वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार 'सेंट्रल मोटार व्हेइकल अॅक्ट'च्या कलम 51 अन्वये ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार, वाहनांवर खालीलप्रमाणे नंबर प्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. नंबर लिहिताना इंग्रजी (रोमन) लिपीचाच वापर करावा. (उदा. 'एमएच 14- जीआर 9999 'ऐवजी 'महाराष्ट्र 14- जीआर 9999' अशी नंबरप्लेट लावणे कायद्याने गुन्हा आहे. क्रमांकदेखील देवनागरी लिपीतून लिहिणे नियमबाह्य आहे. दुचाकी वाहनाच्या पुढील नंबर प्लेटची लांबी 26 सें.मी., रुंदी 4 सें.मी., अक्षरांची उंची 30 मिलिमीटर असावी. अंकांची जाडी 5 मिलिमीटर असावी.
नंबर प्लेटवर या क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो, आदी.) टाकू नये.
नोंदणी क्रमांक स्पष्ट आणि सरळच असावे लागतात. फॅन्सी प्रकारचे क्रमांक टाकल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्रात फॅन्सी नंबरप्लेट वापरल्यास 2000 ते 5000 दंड आकारला जाऊ शकतो.
वाहनांना शासनाच्या नियमानुसार नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. फॅन्सी नंबर प्लेट असणार्या वाहनांवर नियमित कारवाई सुरू आहे. याव्यतिरिक्त 'शटर' नंबर प्लेटसारख्या प्लेट बाजारात आल्या असल्यास संबंधित विक्रेत्यासह चालकावरही कारवाई केली जाईल.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी – चिंचवड
हेही वाचा