Nagar : टाकळीभानचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर | पुढारी

Nagar : टाकळीभानचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे सलाईनवर आले आहे. रुग्णांना सुविधाच मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्राचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे रुग्ण कल्याण समिती व ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेत काम काजात सुधारणा करा, अन्यतः बदली करुन घ्या, अशी तंबी देवून वरीष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

टाकळीभान व ग्रामिण परीसरातील नागरीकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सुमारे 30 वर्षांपुर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे रुग्णांच्या प्रतिसादामुळे सुमारे चार एकर जागेच्या परीसरात सुसज्ज इमारत सर्व सोयींनी युक्त उभी राहिलेली आहे. आरोग्य सुविधेसाठी आतापर्यंतच्या येथे आलेल्या सर्वच वैद्यकिय अधिकार्‍यांनी रुग्णांना सुविधा पुरवण्यात कसुर केलेला नाही. मात्र गेल्या दोन वर्षात आरोग्य केंद्राचा दर्जा सुमार झाला आहे.

आरोग्य केंद्रात बरीच प्रकारची औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचाच सल्ला दिला जात आहे. याबाबत विचारणा केली आसता औषधांचा पुरवठाच होत नसल्याचे सांगितले जाते. येथील वैद्यकिय आधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे यापुर्वी जिल्ह्यात पहील्या दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या या आरोग्य केंद्राने तळ गाठला आहे. रुग्णांच्या सातत्याने येणार्‍या तक्रारीमुळे रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी अचानक आरोग्य केंद्राला भेट दिली असता सकाळचे सव्वा आकरा वाजले असतांनाही एकही कर्मचारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने याबाबत तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली होती. रुग्णकल्याण समिती, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी बैठक घेवून कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेत लवकरच याबाबत विषेश ग्रामसभा घेवून वरीष्ठांकडे तक्रार दाखल करणार आसल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले. एकूणच आरोग्य केंद्रांचा दर्जा अत्यंत सुमार झाला आसल्याने आरोग्य केंद्र ‘असून आडचण नसून खोळंबा’ अशी परीस्थिती निर्माण झालेली आहे.

कर्मचार्‍यांचा कामकाजात चुकारपणा
आरोग्य अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्याने कर्मचारी कामकाजात चुकारपणा करीत आहेत. वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने सर्वच कर्मचारी 11 ते 12 वाजता आरोग्य केंद्रात येतात व फक्त हजेरी लावून तास दोन तासात माघारी फिरतात. रुग्ण मात्र आरोग्य केंद्रात चकरा मारुन बेजार होतात. आरोग्य केंद्राचा परीसर तर अस्वच्छ झाला आहेच तर अंतर्गतही अस्वच्छता पहावयास मिळत आहे.

Back to top button