प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे | पुढारी

प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- राज्यात दंगली होऊ शकतात असे विधान केल्याबद्दल वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेली मागणी हास्यास्पद आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले.

प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा सवाल नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर बोलतांना आंबेडकरांवर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे तसेच त्यांच्याकडून दंगलीचा आधार काय अशी विचारणा करायला हवी, असे जे विधान राणे यांनी केले त्यावर भाष्य करताना अविनाश शिंदे बोलत होते.

प्रकाश आंबेडकर हे एक जाणकार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कोणतेही विधान करण्यापूर्वी ते निश्चितच शंभरवेळा विचार करत असतील. त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने खातरजमा करून योग्य ती पावले उचलण्याऐवजी आंबेडकरांना अटक करा असे म्हणणे एका संवैधानिक पदावर बसलेल्या केंद्रीय मंत्र्यांसारख्या व्यक्तीला शोभा देत नाही. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये, असा सल्लाही अविनाश शिंदे यांनी राणे यांना दिला आहे.

राज्य सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्य करीत आहेत परंतु त्यांच्यावर काही काहीही कार्यवाही होत नाही. राणे यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यात सध्या मराठा आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करून मराठा समाजाचा आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मराठा समाजाचा आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीसुद्धा आग्रही आहे. जरांगे पाटील हे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला घेतात. परंतु राणे यांची मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका आहे. जरांगे पाटलांबद्दल त्यांना विचारणा केली असता कोण जरांगे पाटील मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यावरून त्यांचा मानसिक तोल ढळला असल्याचेच हे लक्षण आहे,अ सेही शिंदे यांनी नमूद केले. प्रकाश आंबेडकर यांच्या अंगाला केवळ हात लावण्याचा प्रयत्न जरी झाला तरी बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची राहील हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही अविनाश शिंदे यांनी दिला आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय साबळे, माजी नगरसेविका ज्योतीताई शिंदे, बजरंग शिंदे, दामोदर पगारे, विवेक तांबे, संदीप काकडे, वामनदादा गायकवाड, सुनील साळवे, उत्तम साळवे, खंडोबा वाघ, तुकाराम मोजाड, हरिभाऊ सावंत, ज्ञानेश्वर अभंग आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button