Pune News : ड्रेनेजबाबत प्रशासनाच्या कागदावर रेघोट्या! | पुढारी

Pune News : ड्रेनेजबाबत प्रशासनाच्या कागदावर रेघोट्या!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील नांदेड, धायरी, नर्‍हे, किरकटवाडी, खडकवासला आदी गावांत ड्रेनेज समस्या गंभीर बनली आहे. कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करणार्‍या महापालिका प्रशासनाकडून आठ-दहा वर्षांपासून केवळ कागदावरच
रेघोट्या मारल्या जात आहेत. बहुतेक भागात ग्रामपंचायत काळातील ड्रेनेजलाईन जीर्ण झाल्या आहेत. ओढ्या-नाल्यांसह रस्त्यावरून ड्रेनेज वाहत आहे. सर्वात गंभीर स्थिती दाट लोकवस्तीच्या धायरी-नर्‍हे हद्दीवरील पारी कंपनी, श्री कंट्रोल चौक, अभिनव कॉलेज रोड, तसेच धारेश्वर मंदिर परिसर, रायकर मळा आदी ठिकाणी झाली आहे.
धायरी-नर्‍हे  रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही ड्रेनेजची समस्या गंभीर बनल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
दुर्गंधीयुक्त मैलापाणी, तसेच डास व माशांच्या उपद्रवामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठिकठिकाणी डबकी साठली आहेत. परिसरात माजी नगरसेवक हरिदास चरवड व नागरिकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, महापालिकेत समावेश होऊनही या भागातील ड्रेनेज समस्या कायम आहे. रस्त्यावर मैलापाणी, ड्रेनेज वाहत असल्याने पावसाळ्यासारखी स्थिती आहे.
महापालिकेत समावेश झाल्यापासून नांदेड, किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी भागाची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. असे असताना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
– रूपेश घुले, उपाध्यक्ष, खडकवासला भाजप
समाविष्ट गावांत ग्रामपंचायत काळातील जुन्या  लाईन अपुर्‍या पडत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ड्रेनेज लाईन नाहीत. त्यामुळे  या भागात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे.
– प्रदीप आव्हाड,  सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा

Back to top button