Pune News : महापालिकेच्या वतीने कर थकबाकीसाठी लोकअदालत | पुढारी

Pune News : महापालिकेच्या वतीने कर थकबाकीसाठी लोकअदालत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकराची थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिकेच्या वतीने 9 डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी या लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन थकबाकीच्या दंडावर सवलत घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. महापालिका हद्दीतील मिळकतींना मिळकतकर विभागाकडून कर आकारणी केली जाते. या मिळकतींचा कर 1 एप्रिल ते 31 मे यादरम्यान भरणार्‍यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते.

मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम 25 हजारांपेक्षा कमी आहे अशा मिळकतधारकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये 10 टक्के सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम 25 हजार 1 रुपयांपेक्षा जास्त असणार्‍या मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये 5 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेकडून धकबाकी वसुलीसाठी कारवाईची मोहीम राबवली जाते. या मोहिमेत मिळकतीला टाळे ठोकण्यापासून ती जप्त करण्यापर्यंत कारवाया केल्या जातात. एवढे करूनही थकबाकीदारांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.

लोकअदालत 9 डिसेंबरला

2800 कोटींच्या घरात सर्वसाधारण मिळकतकराची थकबाकी आहे, तर 2500 कोटींच्या घरात व्यावसायिक मिळकतींची थकबाकी आहे. थकबाकी वसूल होण्यासाठी 9 डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. यामध्ये मूळ कर कमी होणार नाही. मात्र, थकबाकीवर लावलेल्या व्याजाच्या रकमेवर तडजोड होणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

सवलतीसाठी दोन दिवस

स्वतः राहत असलेल्या सदनिकेच्या मिळकत करात 40 टक्के सवलत मिळवण्यासाठी महापालिकेकडे करावयाच्या पीटी – 3 अर्ज करण्याची मुदत केवळ दोन दिवस राहिली आहे. अर्ज करण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ देऊनही अद्याप दोन लाख अर्ज येणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

महापालिकेकडून निवासी मिळकतींना मिळकतकरात चाळीस टक्के सवलत दिली जात होती. ती रद्द केल्यानंतर संपूर्ण मिळकत कर भरावा लागत होता. याविषयी नाराजी निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने 2019 पासून (नवीन मिळकत) निवासी मिळकतींकडून पूर्ण कर वसूल केला आहे, अशा तीन लाख मिळकती असून, त्यांना चाळीस टक्क्यांची सवलत मिळविण्यासाठी पीटी -3 अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

तसेच ज्या निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली, अशांना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून ’पीटी – 32 अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्याची 15 नोव्हेंबर अंतिम मुदत होती. मात्र, अपेक्षित अर्जांची संख्या न आल्याने 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अर्ज करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. पीटी – 3 अर्ज दाखल न केल्यास 40 टक्के सवलत संपुष्टात येणार आहे. दरम्यान, 40 टक्के सलवत न मिळालेल्या तसेच सवलत रद्द झालेल्या सुमारे तीन लाख मिळकती शहरात असून पालिकेकडे सुमारे एक लाखाच्या आसपास पीटी – 3 अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा

‘त्याच्या’ नाकात पाच महिने होती चॉपस्टिक!

Salman Khan : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Pune Drugs Case : ललित पाटील याला मदत करणारे तिघे अटकेत

Back to top button