‘त्याच्या’ नाकात पाच महिने होती चॉपस्टिक!

‘त्याच्या’ नाकात पाच महिने होती चॉपस्टिक!

डांग होई : कधी कधी आपल्याच शरीरात अनाहुत पाहुणे येऊन ठाण मांडून बसत असतात आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते. एखाद्याच्या कानात, डोळ्यात किंवा नाकात कीटक गेल्याची उदाहरणे अनेक आहेत. एका माणसाच्या चक्क पोटात जिवंत माशीही आढळलेली आहे. काही वस्तूंचे तुकडेही अनेक वर्षे एखाद्याच्या शरीरात राहून जात असतात. आता व्हिएतनाममधील एका माणसाच्या नाकात चक्क चॉपस्टिकचे तुकडे असल्याचे आढळून आले. हे तुकडे आपल्या नाकात आहेत याची त्यालाही कल्पना नव्हती. तब्बल पाच महिने हे तुकडे त्याच्या नाकात होते!

या माणसाला पाच महिन्यांपासून डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे, नाकातून पाणी येणे अशी समस्या भेडसावत होती. त्याचे सिटी स्कॅन केल्यावर दिसून आले की, त्याच्या नाकात काही तरी आहे जे त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले होते. हे दुसरेतिसरे काही नसून चॉपस्टिकचे तुकडे होते. ही व्यक्ती व्हिएतनामच्या डांग होईमध्ये क्यूबा फे्रंडशिप हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे हा खुलासा झाला. हे पाहून हैराण झालेल्या डॉक्टरांनी त्याच्याकडे याबाबत पृच्छा केली. आधी त्याने ताकास तूर लागू दिली नाही.

मग त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी नशेत असताना त्याचे काही लोकांशी भांडण झाले होते. त्यावेळी बरीच हाणामारीही झाली. जखमी अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला व डॉक्टरांनी मलमपट्टी करून त्याला घरी सोडले. आता त्याला आठवत आहे की, भांडणावेळी एकाने त्याच्या नाकात चॉपस्टिक घुसवली होती! त्याचेच तुकडे त्याच्या नाकात होते. डॉक्टरांनी नाकात एंडोस्कोपिक सर्जरी करण्याचे ठरवले. त्यांनी मायक्रोसर्जरी करून त्याच्या नाकातील हे चॉपस्टिकचे तुकडे बाहेर काढले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news