Pune Drugs Case : ललित पाटील याला मदत करणारे तिघे अटकेत | पुढारी

Pune Drugs Case : ललित पाटील याला मदत करणारे तिघे अटकेत

पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील याला ससून सर्वोपचार रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणार्‍या रुग्णालयातील शिपाई, कारागृह पोलिसासह कारागृहातील समुपदेशकास अटक करण्यात आली. शिपाई महेंद्र यशवंत शेवते (वय 57, रा. रक्षकनगर, खराडी), पोलिस मोईस अहमद शेख (वय 30, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) व समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय 44) अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान, शेवते व शेख यांस न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. इंगळे याला मंगळवारी उशिरा अटक केल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने शेवते आणि शेख यांना अटक करत प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले. या वेळी, सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव युक्तिवादादरम्यान म्हणाल्या की, महेंद्र शेवते हा ललित पाटीलसह भूषण पाटील, अभिषेख बलकवडे यांच्या संपर्कात होता. त्याने ललित पाटीलला पळून जाण्यास कशा प्रकारे मदत केली याचा तपास करायचा आहे.

तसेच मोईस शेख हा येरवडा जेलचा कर्मचारी ससूनमधील वार्ड क्रमांक 16 समोर गार्ड ड्युटीस होता. 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा मोईस शेख याचा मोबाईल वापरून अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी फोनवर बोलला आणि त्यानंतर पसार झाला. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. आरोपींच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड समीर घाटगे यांनी न्यायालयास सांगितले की, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने महेंद्र शेवते यांना सुट्ी होती. त्यामुळे शेवते ललित पाटीलला पळून जाण्यास कशी काय मदत करू शकतात, असे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींना एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा

एकटेपणा हा रोज पंधरा सिगारेट ओढण्याइतकाच घातक!

Pune News : फायनान्स कंपन्यांची सावकारी फोफावली !

राष्ट्रवादीच्या नादात काँग्रेसचीही पृथ्वीराज चव्हाणांमुळे वाताहत : सुनील तटकरे

Back to top button