Pune News : बेशिस्त चालकांना आता 1 हजारापेक्षा अधिक दंड | पुढारी

Pune News : बेशिस्त चालकांना आता 1 हजारापेक्षा अधिक दंड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात बेशिस्तपणे, वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करणार्‍या पीएमपी चालकांसंदर्भात
दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिध्द करताच पीएमपी प्रशासन चांगलेच हलले. त्याची दखल घेत प्रशासनाने चालकांना सक्त ताकीद देणारे पत्र काढले आणि दंडात्मक कारवाईमध्ये वाढ करीत पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. शहरात पीएमपीच्या बस गाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. 23) पाहणी करून वृत्त प्रसिध्द करण्यात आले. त्याची दखल घेत पीएमपी प्रशासनाने चालकांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा हाती घेतला असून, बेशिस्त चालकांसाठी पत्र काढण्यात आले आहे. तसेच, डेपो मॅनेजरलासुध्दा याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.

पीएमपीने पत्रात काय म्हटले…

पीएमपीकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणार्‍या तक्रारींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सूचना दिल्या आहेत. यात बस संचलन करताना मोबाईल फोनचा वापर करू नये. वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरीत्या करावे, धूम—पान करू नये, थांब्यावरच बस योग्य जागी उभ्या करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करावे, भरधाव वेगाने बस संचलन करू नये, अशा विविध प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे महामंडळाकडून कर्मचार्‍यांना निर्देश दिले आहेत.

चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालन न झाल्यास त्यांच्यावर 1 हजारापेक्षा अधिकचा दंड आकारण्यात येईल. तसेच, जर एखादा चालक सातत्याने वाहतुकीचे नियमभंग करीत असेल, तर त्याला निलंबित करण्यात येईल. याकरिता पथके नेमण्यात आली असून, आगार व्यवस्थापकांना देखील कडक सूचना करण्यात आल्या आहेत.

-सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

हेही वाचा

राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतिस्तंभातील राजचिन्ह चोरीला

जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार

तेलंगणात कुणाचे पारडे जड?

Back to top button