राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतिस्तंभातील राजचिन्ह चोरीला | पुढारी

राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतिस्तंभातील राजचिन्ह चोरीला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतानाच, गिरगावातील खेतवाडी येथील त्यांच्या स्मृतिस्तंभाचे एक नक्षीदार मोर्चेल (छत्रपतींचे राजचिन्ह) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

6 मे 1922 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे खेतवाडीतील 13 वी गल्ली येथील ‘पन्हाळा लॉज’ येथे पहाटेच्या सुमारास निधन झाले. मुंबईत आल्यानंतर शाहू महाराज याच ठिकाणी वास्तव्यास असायचे. पन्हाळा लॉजच्या जागेवर आता दि एडुल आय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची इमारत झाली आहे. महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त या इमारतीच्या बाहेरील पदपथावर गेल्यावर्षी एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. 5 मे 2022 रोजी आदित्य ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे आदी मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.

मुंबई महापालिकेकडून स्मृतिस्तंभ निर्मिती

मुंबई महापालिकेने या स्मृतिस्तंभाची निर्मिती केली आहे. स्तंभाची उंची 10 फूट असून, आराखडा तयार करण्यासाठी कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संस्थेची मदत घेण्यात आली होती. बेसॉल्ट दगडापासून हा स्मृतिस्तंभ तयार करण्यात आला आहे. त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असून, अखेरच्या क्षणी शाहू महाराजांनी उच्चारलेले वाक्य कोरण्यात आले आहे. शिल्पकार ओंकार कोळेकर यांनी हा स्मृतिस्तंभ घडवला आहे.

स्मृतिस्तंभाच्या वरच्या भागामध्ये शाहू महाराजांचे एक गोलाकार शिल्प आहे. या शिल्पाच्या खालच्या बाजूला दोन नक्षीदार मोर्चेल बसवण्यात आले होते. ब्राँझ धातूपासून हे मोर्चेल तयार करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी एक मोर्चेल तेथे नसल्याचे दिसून येत आहे. कोणी तरी हे मोर्चेल चोरून नेल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button