सूर्यावर प्रथमच दिसला ‘ऑरोरा’ | पुढारी

सूर्यावर प्रथमच दिसला ‘ऑरोरा’

वॉशिंग्टन : पृथ्वीवर ध्रुवीय प्रदेशांमध्ये ‘नॉर्दन लाईटस्’ किंवा ‘ऑरोरा’ या नावाने प्रसिद्ध असलेला प्रकाशझोतांचा खेळ आकाशात रंगत असतो. हे रंगीबेरंगी प्रकाश मानवी मनाला मोहवत असतात. सौरकण ज्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकतात, त्यावेळी आकाशात असे रंगीत प्रकाशझोत तयार होतात. आता खुद्द सूर्यावरच अशा ऑरोरासारखे दृश्य प्रथमच पाहायला मिळाले आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर आसमंतात हा ‘ऑरोरा’ दिसला ज्यामधून रेडिओ लहरी उत्सर्जित होत होत्या. अगदी पृथ्वीवरील ऑरोरासारखीच ही घटना होती.

सूर्यावरील एका डागाच्या म्हणजेच सनस्पॉटच्या वर 40 हजार किलोमीटर उंचीवर हा सोलर लाईटशो झाला! हा सनस्पॉट म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय आवरणाखाली असलेला गडद ठिपका आहे. या ऑरोरामधून मोठ्या प्रमाणात रेडिओ लहरी उत्सर्जित झाल्याचे दिसून आले. यापूर्वी एका दूरस्थ तार्‍यावर असा ऑरोरा दिसून आला होता; पण सूर्यावरही अशी घटना घडते हे आजपर्यंत दिसलेले नव्हते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अमेरिकेतील न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सेंटर फॉर सोलर-टेरेस्ट्रियल रिसर्चमधील सिजी यू यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना नेहमीच्या सोलर रेडिओ बर्स्टपेक्षा वेगळी होती. असा बर्स्ट काही मिनिटांपासून तासांपर्यंत होत असतो. या ‘ऑरोरा’च्या घटनेमुळे सूर्यावरील चुंबकीय प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत मिळेल.

Back to top button