Leopard News : चांडोली येथे पती-पत्नीवर बिबट्याचा हल्ला | पुढारी

Leopard News : चांडोली येथे पती-पत्नीवर बिबट्याचा हल्ला

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. आंबेगाव) येथून चांडोली येथे चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १५) रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत भरत गोविंद राऊत (रा. पेठ, ता. आंबेगाव) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरत गोविंद राऊत (वय ५३), पत्नी रचना भरत राऊत (वय ४३) व मुलगा समर्थ भरत राऊत (वय ११) हे भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून बुधवारी रात्री ९ वाजता पेठ येथुन चांडोली येथे चुलत भाऊ राहुल रेवजी राऊत यांच्या घरी चुलत्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले होते. साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते चांडोली फाटा येथे आले असता रस्त्याने जात असताना रस्त्याच्या बाजूकडे उसातून अचानक बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी बिबट्याने भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी पळवली, तेव्हा काही वेळ बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यांची पत्नी दुचाकीच्या मागे बसली असता तिने प्रसंगावधान दाखवत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली. त्यामुळे बिबट्या दबकला; मात्र तो त्यांचा हळूहळू पाठलाग करत होता. त्याचवेळी रस्त्यावरून मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने बिबट्या पळून गेला.

भरत राऊत यांनी दुचाकी पळवत पुढे येऊन थांबवली. त्यावेळी त्यांच्या पायातून रक्त पडत होते. त्यांनी त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येत भरत राऊत यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना कळवळे आहे.

हेही वाचा

Back to top button