vishalgad :विशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी गडवासीयांचे आमदार विनय कोरे यांना निवेदन | पुढारी

vishalgad :विशाळगड येथे पर्यटन वाढीसाठी गडवासीयांचे आमदार विनय कोरे यांना निवेदन

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक असलेल्या किल्ले विशाळगडवरील पर्यटन व्यवसाय विविध कारणांमुळे बंद आहे. स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. पर्यटकांनी गडाकडे पाठ फिरविल्याने पर्यटन व्यवसायाला मंदी आली आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिक मेटाकुटीला आले असून गडवासीयांनी गड सोडून बाहेर जाण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा मागणीचे निवेदन गडवासीयांनी शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांना दिले. (vishalgad)

या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून गडावर बाजीप्रभू देशपांडे समाधी, मलिक रेहान दर्गा, मुंढा दरवाजा, अहिल्याबाई होळकर समाधी, महादेव मंदिर, राम मंदिर आदीसह अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दरवर्षी लाखों पर्यटक पर्यटनासाठी गडावर येतात. गडवासीयांचा उदरनिर्वाह पर्यटक व गडावर अवलंबून आहे. गडवासीयांचा छोटा-मोठा व्यवसाय येथे आहे. तसेच गडवासीयांसह गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मुसलमानवाडी, गजापूर, बौध्दवाडी, केंबुर्णेवाडी, भाततळी आदींसह लोकांचा येथील पर्यटनावर रोजीरोटीचा प्रश्न अवलंबून आहे. (vishalgad)

मात्र, गेल्या चार- पाच महिन्यांपासून विविध कारणामुळे येथील व्यवसाय डबघाईस आला आहे. गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून स्थलांतरित होऊ लागली आहेत. येथील पर्यटन व्यवसाय जोमाने सुरू होण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करावा. निवेदनावर धोंडीराम जंगम, भिकाजी भोसले, चंद्रकांत जंगम, नंदकुमार शिंदे, नागेश जंगम, ग्रामपंचायत सदस्य मनोज भोसले, बंडू भोसले आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button