लवंगी मिरची : नैराश्याला भेदणारा उजेड! | पुढारी

लवंगी मिरची : नैराश्याला भेदणारा उजेड!

अंगणभर पसरणार्‍या उजेडासारख्या आभाळभर शुभेच्छा! लक्ष लक्ष दिव्यांच्या माध्यमातून अंधकार नष्ट करणारा सण म्हणजे दिवाळी. अशा काही वैशिष्ट्यपूर्ण सणामुळे भारतातील संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था चांगल्यापैकी टिकून आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणणारा आनंददायी सण म्हणजे दिवाळी. दिवाळी आनंद घेऊन येते, समृद्धी घेऊन येते आणि त्याचबरोबर नैराश्याला भेदणारा उजेड घेऊन येते.

भरपूर उलाढाल होत असल्यामुळे व्यापारीवर्ग या काळात खुशीत असतो. दिवाळीच्या पाडव्यापासून नव्या वह्या, नवीन नोंदणी सुरू होते. वह्या वापरल्या जात नसतील, तरी संगणकावर नव्या फाईल ओपन करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. दिवाळी म्हणजे प्रत्येकाला आनंद देणारा सण. लहान मुले भरपूर फटाके उडवायला मिळणार आणि भरपूर गोडधोड खायला मिळणार म्हणून खूश असतात. आपल्या कुटुंबासाठी फराळाचे चविष्ट पदार्थ करता येतील म्हणून महिलावर्ग खूश असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य लोक पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यासाठी आलेले असतात. हे सगळे लोक सहकुटुंब आपल्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी जातात. रस्त्यांवरची गर्दी जवळपास 80 टक्के कमी झाली असते. त्यामुळे गोंधळ, गर्दी आणि वाहतूक कोंडी यातून सुटका झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूश असतात.

सकाळी भरपूर फराळ करावा, दुपारी मजबूत जेवण करावे, संध्याकाळी बाहेर फेरफटका मारून येऊन घरीच चवदार अशी खिचडी खावी आणि मुख्य म्हणजे हे खाल्लेले दिवसभर पचवावे. एव्हढेच काय ते पुरुषांना काम असते. या काळात महिलांवर घर कामाचा अतिरिक्त ताण असतो. लग्नानंतरची पहिली दिवाळी असेल, तर त्याला दिवाळसण असे म्हणतात. सासूरवाडीकडून भेटवस्तू आहेरात येणार म्हणून नवीन जावई उत्साहात असतात आणि माहेरी जायला मिळणार म्हणून नवीन सुनबाई खूश असतात. सासरच्या घरचे लक्ष्मीपूजन केले की, पाडव्याला वडिलांना ओवाळायचे असते. त्यामुळे नुकतेच लग्न झालेल्या विवाहिता दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात.

गाय वासराची पूजा म्हणजेच वसुबारसपासून जवळपास दिवाळीला सुरुवात होते आणि मग सलग चार दिवस भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा झगमगाट असतो. बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी आणि तिला भक्कम ओवाळणी टाकण्यासाठी बंधुराज सज्ज झालेले असतात. आपला जीवाभावाचा लाडका भाऊ भेटणार म्हणून बहिणाबाई उत्साहात असतात. प्रत्येकाला काही ना काही तरी देऊन जाणारी दिवाळी हा एक अत्यंत आनंददायी सण आहे. अभ्यंगस्नानाच्या दिवशी आपल्या कन्येकडून आणि पत्नीकडून उटणे लावून घेण्याचा आनंद एका पित्यालाच किंवा पतीलाच समजत असतो. सूर्योदयापूर्वी नरक चतुर्दशीची अंघोळ आटोपण्याची सकाळच्या वेळी जी धांदल असते तिचा उत्साह काही औरच असतो. लक्ष्मीपूजन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण, लक्ष्मीच्या आशीर्वादानेच जीवन जगणे सुखद आणि सुसह्य होत असते. ही दीपावली आमच्या सर्व वाचकांना आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच शुभेच्छा!

Back to top button