‘या’ गावात राहते केवळ एकटी महिला; कारण तिला एकांतवास… | पुढारी

‘या’ गावात राहते केवळ एकटी महिला; कारण तिला एकांतवास...

पॅरिस : माणूस समाजप्रिय असणे स्वाभाविक मानले जाते. मात्र, एखादी व्यक्ती जर संपूर्ण गावात एकटीच राहत असेल, तर त्यामुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. वास्तवात फ्रान्समध्ये अशीच एक घटना घडली आहे.

या महिलेचे नाव जोसेट असून, तिचे वय आहे 65. गेल्या अनेक वर्षांपासून ही महिला रोशफोरचॅट नावाच्या गावात अगदी एकटी राहत आहे. गावात प्राण्यांचीच संख्या जास्त आहे. ‘द सन’ या संकेतस्थळाने याविषयीचे वृत्त दिले आहे. खरे तर फ्रान्समध्ये एकूण 35,083 नगरपालिका आहेत. रोशफोरचॅट ही त्यातील सर्वात छोटी पालिका आहे. या गावात एक महाल, एक जुने चर्च, कबरस्तान आणि टेलिफोन बूथ आहे. हे बूथसुद्धा सध्या बंद स्थितीत आहे.

सरकारी नोंदीनुसार या सगळ्या गोष्टींवर जोसेटची मालकी आहे. आता कोणालाही असा प्रश्न पडू शकतो की, जोसेट 2005 पासून अशा निर्जनस्थळी एकांतात का राहत आहे. त्याचे उत्तर म्हणजे तिला एकांतवास विलक्षण प्रिय आहे. तिने आपल्या घरावर सोलर पॅनल बसवून घेतले असून, त्यामुळे विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. मात्र, खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठी जोसेटला सहा किलोमीटर पायपीट करून दुसर्‍या गावात जावे लागते. कधी तरी तिला तिचे नातेवाईक भेटायला येतात, तेव्हा सगळे जण एकत्रितरीत्या शिकारीला जात असत. आता त्यांचे येणे-जाणेही थांबले आहे. तथापि, जोसेटने अजूनही गाव सोडलेले नाही. ती म्हणते, येथील एकांत मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला काय वाटते, याची फिकीर मी करत नाही.

Back to top button