Gram Panchayat Election: गुलाल आपलाच…टेन्शन नाय भावा; ग्रा.पं.निवडणुकीसाठी चुरशीने मतदान | पुढारी

Gram Panchayat Election: गुलाल आपलाच...टेन्शन नाय भावा; ग्रा.पं.निवडणुकीसाठी चुरशीने मतदान

सुभाष पाटील

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व शिरगावमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित गावांमध्ये आज (दि.५ ) जोरदार चुरस पाहावयास मिळाली. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर भिरकीट सुरू होती. तर चौकाचौकांत समर्थक व गावकरी मुलूखगिरी करताना दिसून येत होते. गेल्या काही दिवसापासून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मतदानासाठी रान उठविले. गुलाल आपलाच…टेन्शन नाय भावा, अशा प्रतिक्रिया मतदानस्थळी ऐकावयास मिळाल्या. आता त्यांना फक्त गुलालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  (Gram Panchayat Election)

निवडणूक लागलेल्या गावागावात सकाळपासूनच ‘इलेक्शन फीव्हर’ पाहायला मिळाला. अगदी मतदानाच्या सुरुवातीपासून ते मतदान पार पाडल्यानंतर सर्वत्र मतदान व त्या अनुषंगाने झालेल्या घडामोडीचा बोलबाला दिसून आला. अन्य निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायतीचे मतदान म्हणजे प्रतिष्ठेची बाब समजली जाते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व नेते उराला वाळू लावून या निवडणुकीत उतरत असतात. याचा प्रत्यय आज प्रत्यक्ष मतदानावेळी दिसून आला. (Gram Panchayat Election)

गावागावातील कार्यकर्ते आपल्या बाजूने मतदान होण्यासाठी दिवसभर भिंगरी सारखे पळत राहिले. मतदान केंद्रावर तर मतदारा इतकाच स्थानिक कार्यकर्त्यांचा राबता राहीला. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वीच अनेक जण केंद्रावर येऊन थांबले होते. काहींनी तर परगावी जाता-जाता मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र पाहायला मिळाले. जास्तीत-जास्त मतदार घराबाहेर काढण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची पळापळ व दमछाक झाली. मतदान केंद्र परिसरात कार्यकर्त्यांनी ‘तळ’ ठोकला होता. तर एकीकडे कार्यकर्ते मेहनत घेत होते.

कष्टकरी आणि नोकरदार मतदारांनीही सकाळी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे एकाच वेळी आलेल्या मतदारामुळे अनेकदा मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला मतदान करून जाण्याची घाई झालेली होती. काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने अधिकाऱ्यांशी काहींनी हुज्जत घातली. मतदार यादीत नाव आहे, पण मतदार ओळखपत्र नसल्याने अनेकांची गोची झाल्याचे निदर्शनात येत होते.

Gram Panchayat Election : अनेक ठिकाणी प्रतिष्ठा पणाला

अनेक गावांत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. सत्ता स्थापनेसाठी राजकीय पुढाऱ्यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. आठ दिवसापासून बैठका, सभा घेतल्यानंतर पुढारी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने सोमवार (दि ६) मतमोजणी कडे लक्ष लागले आहे.

ग्रामदैवतांना साकडे….मतदारांकडून शपथा

ठिकठिकाणच्या उमेदवारांनी ग्रामदेवतांना विजयासाठी साकडे घातले. तर ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार होऊनही संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या मतदारांवर कार्यकर्त्यांची करडी नजर होती. आपणालाच मतदान करणार अशा देवदेवतांच्या शपथा निवडणूक रिंगणातील उमेदवार मतदारांकडून घेत होते.

भरारी पथकाकडून तपासणी

आचारसंहिता भरारी पथकांनीही मतदान केंद्रावर अचानक भेटी देऊन तपासणी केली. तसेच पोलिसांच्या पथकाने ही संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्राची कसून पाहणी केली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button