कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्याची वायर कापल्याचा संशय | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्याची वायर कापल्याचा संशय

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरण क्षेत्रात थेट पाईपलाईन योजनेच्या वीज पुरवठ्याची वायर अज्ञाताने कापल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्रेयवादाच्या राजकारणातून हे कृत्य केले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे थेट पाईपलाईन योजना पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, महापालिका अधिकार्‍यांनी काळम्मावाडी धरण क्षेत्रात योजनेची चाचणी घेताना ट्रान्स्फॉर्मर व वायर जळाल्याची माहिती बैठकीत दिली होती.

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना अंतिम टप्प्यात आहे. योजनेवरून श्रेयवाद रंगला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीत लोकार्पण होईल, असे जाहीर केले आहे. तत्पूर्वी आ. सतेज पाटील यांनी पुईखडीत पाणी आल्यानंतर पूजन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी श्रेयवादात उडी घेतली आहे.

दरम्यानच्या कालावधीत मराठा आरक्षणासाठी राज्यात तीव— आंदोलन सुरू असल्याने उद्घाटने व इतर कार्यक्रम लोकप्रतिनिधींनी रद्द केले होते. वातावरण शांत होईपर्यंत योजनेचे काम रेंगाळत ठेवण्यासाठी कुणीतही वायर कापल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे योजना पूर्ण होण्यात पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत.

Back to top button