कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी आज मतदान | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

कोल्हापूर : गावागावांमध्ये उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि. 5) मतदान होत आहे. शेवटच्या क्षणी दगाफटका होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी शनिवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोमवारी (दि. 6) मतमोजणी होणार असून, मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उमेदवारांची धाकधूक वाढली असून, शेवटच्या टप्प्यात एक-एक मत वळविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांनी तयारी ठेवली होती.

जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे सरपंचपद खुल्या प्रवर्गातील असलेल्या गावांमध्ये टोकाची चुरस आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी भाऊबंदकीतच लढाई असल्याचे चित्र आहे. सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात होणार होईल. मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य रवाना झाले आहे. संवेदनशील गावांमध्ये जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेर गावी असणार्‍या मतदारांना आणण्याचे उमेदवारांनी नियोजन केले असून, वाहनेदेखील पाठविण्यात आली आहेत.

मतदानाच्या आदल्या दिवशीच्या रात्री आपल्या गडामध्ये गडबड होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी शनिवारची रात्र अक्षरश: जागून काढली. मतांचे आपापले बालेकिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच दगाफटका होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचा पहारा होता. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे 73 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

Back to top button