Gram Panchayat Election : मराठा आरक्षणासाठी बीडमधील १८ ग्रामपंचायतींचा बहिष्कार; मतदान प्रक्रिया रद्द | पुढारी

Gram Panchayat Election : मराठा आरक्षणासाठी बीडमधील १८ ग्रामपंचायतींचा बहिष्कार; मतदान प्रक्रिया रद्द

बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता, यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. आज जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असताना या १८ गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. (Gram Panchayat Election)

पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथे नऊ सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. (Gram Panchayat Election)

उद्या होणार मतमोजणी

राज्यातील गावागावांमध्ये उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज (दि.५) मतदान होत आहे. शेवटच्या क्षणी दगाफटका होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी शनिवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोमवारी (दि.६) मतमोजणी होणार आहे. उमेदवारांची धाकधूक वाढली असून, शेवटच्या टप्प्यात एक-एक मत वळविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे सरपंचपद खुल्या प्रवर्गातील असलेल्या गावांमध्ये टोकाची चुरस आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी भाऊबंदकीतच लढाई असल्याचे चित्र आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. संवेदनशील गावांमध्ये जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button