खेड तालुक्यात प्रथमच बिल्डरच्या कार्यालयात दस्तनोंदणी | पुढारी

खेड तालुक्यात प्रथमच बिल्डरच्या कार्यालयात दस्तनोंदणी

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : राज्य शासनाने फर्स्ट सेल फ्लॅट, प्लॉटची दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता संबंधित बिल्डर्सच्या कार्यालयातच दस्तनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नवीन नियमानुसार शहरी भागात अंमलबजावणी असलेली ही प्रक्रिया आता ग्रामीण भागातदेखील सुरू झाली असून, खेड तालुक्यात म्हाळुंगे येथील एनए प्लॉटच्या विक्रीसाठी नाईकनवरे बिल्डर्स यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती खेडचे सहदुय्यम निबंधक क्रमांक तीनचे एस. आर. परदेशी यांनी दिली.

राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दीड-दोन महिने बंद होती. याचा फार मोठा फटका राज्य शासन, बांधकाम व रियल इस्टेट व्यवसायाला बसला होता. या पार्श्वभूमीवर व दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी, सर्वसामान्य नागरिक व बिल्डरांच्या सोयीसाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने फर्स्ट सेल प्रॉपर्टीचे दस्तनोंदणीचे अधिकार बिल्डरांना देण्याचा निर्णय घेतला.

या अंतर्गत राज्यातील बिल्डरांना दस्तनोंदणीचे अधिकार देण्यात आल्याने फर्स्ट सेल फ्लॅटची दस्तनोंदणीची सर्व प्रक्रिया संबंधित बिल्डर आपल्या कार्यालयातच पूर्ण करतात. त्यानंतर दस्तावर संबंधित दुय्यम निबंधकांची डिजिटल सही होऊन प्रक्रिया पूर्ण होते. यामुळे बिल्डरांनादेखील दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.

शासनाच्या नवीन नियमानुसार आम्ही शहरी भागासोबतच ग्रामीण भागातदेखील ई-दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आमच्या ग्राहकांसाठी गृहखरेदीसाठी सोपा मार्ग तयार केला आहे. आमचा विश्वास आहे की, लोकांना सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्या दिशेने ई-नोंदणी हे एक महत्त्वाचे पाऊल आम्ही उचलले आहे. आमच्या खेड तालुक्यातील चाकण-म्हाळुंगे येथील
एनए व रेरा मान्य प्लॉटिगसाठीदेखील आम्ही ई- दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

– आनंद नाईकनवरे,
हेड बिझनेस प्रोसेस, नाईकनवरे डेव्हलपर्स

शासनाच्या ई-दस्त नोंदणीमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. खेड तालुक्यात देखील प्रथमच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित बिल्डरच्या कार्यालयात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन माध्यमातून हा दस्त आमच्याकडे येतो. यामुळेच आता ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्याची गरज नाही.

– एस.आर.परदेशी, सहदुय्यम निबंधक क्रमांक तीन, खेड

हेही वाचा

कुणबी दाखल्यांसाठी प्रशासन सरसावले

Pune Crime News : पुण्यात उमेदवारांच्या फोटोंना जादूटोणा, भाणामती; ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार

दै. पुढारी-टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा लकी ड्रॉ उत्साहात

Back to top button