Thane News: शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा वाद; शिंदे गटाकडून मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त | पुढारी

Thane News: शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा वाद; शिंदे गटाकडून मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. मुंब्र्यातील शिवसेना शाखा गुरुवारी दुपारी शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली असून रात्री ही शाखा बुलडोजर लावून जमीनदोस्तही करण्यात आली. या शाखेमध्ये गैरकारभार सुरु होता तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे समाजपयोगी कामे होत नव्हती असा आरोप शिंदे गटाने केला आहे. ही शाखा तोडून पुन्हा नव्याने शाखा बांधण्यात येणार असल्याचे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैरकारभार सुरु नव्हते असा खुलासा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Thane News)

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेना शाखा कोणाच्या ? हा तिढा अजूनही सुटलेला नाही. पक्षात दोन गट पडल्यानंतर शाखा ताब्यात घेण्यावरून यापूर्वीच वाद चिघळला होता. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यापूर्वीही आमने-सामने आले आहेत. शाखा ताब्यात घेण्यावरून हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. मुंब्र्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शाखा शिंदे गटाने ताब्यात घेऊन बुलडोजर लावून जमीनदोस्त केली.  (Thane News)

गुरुवारी दुपारी ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय कदम आणि पदाधिकारी शाखेत बसले असताना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे हे त्यांच्या समर्थकांसह या शाखेत आले आणि या शाखेचा ताबा त्यांनी घेतला. विशेष म्हणजे ही शाखा ताब्यात घेऊन ते थांबले नाहीत तर रात्री ही शाखा बुलडोजर लावून जमीनदोस्तही करण्यात आली.

मुंब्रा कौसा मध्यवर्ती शिवसेना शाखा या ठिकाणी शाखेच्या नावाने गैरकारभार सुरू होता असा आरोप राजन किणे यांनी केला आहे . शाखेच्या आजूबाजू परिसर भाड्याने देऊन पैसे कमवण्याचे काम सुरू होते, या शाखेत कोणत्याही प्रकारचे समाजपयोगी काम होत नव्हते. कुठलीही नोंदणी या शाखेत होत नव्हती. या कारणास्तव ही शाखा आम्ही तोडून नव्याने शिवसेना शाखा बांधत असल्याचे राजन किणे यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे नव्याने चांगली शाखा बांधून समाज उपयोगी कामे होणार असल्याचे देखील राजन किणे यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाकडून किणे यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. या ठिकाणी कुठेही कमर्शियल काम तसेच गाळे भाड्याने दिले जात नव्हते असा खुलासा ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय कदम यांनी केला आहे .पुढील पाऊल वरिष्ठांना विचारल्याशिवाय घेतले जाणार नाही असे देखील स्पष्ट कदम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक असलेल्या राजन किणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात मतदार संघात आव्हान देण्यासाठी मुंब्रा विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात मुंब्र्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Thane News : शाखा तोडण्याचा अधिकारी कोणी दिला ?

यापूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र अशाप्रकारे शाखा ताब्यात घेऊन थेट बुलडोजर लावून शाखा तोडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे . ठाकरे गटाचे पदाधिकारी आता यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र दुसरीकडे एखाद्या वास्तूवर कारवाई करण्याचा अधिकार हा महापालिकेचा असून कायदेशीर प्रक्रिया करून कारवाई केली जाते. किणे यांच्याकडून थेट बुलडोजर लावून शाखा तोडण्यात आली आहे. तर नवीन शाखा बांधण्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या शाखेवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली नसल्याचे मुंब्रा प्रभाग समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर अशाप्रकारे शाखा तोडण्याचा अधिकार किणे यांना आहे या प्रश्नावर मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

हेही वाचा 

Back to top button