फ्रान्समध्ये सापडला सफेद हायड्रोजनचा खजिना | पुढारी

फ्रान्समध्ये सापडला सफेद हायड्रोजनचा खजिना

पॅरिस : फ्रान्समध्ये दोन वैज्ञानिकांनी जमिनीखाली एक असा खजिना शोधला ज्याची आता जगभर चर्चा आहे. हवामान बदलाच्या संकटापासून जगाला वाचविण्यासाठी हा खजिना उपयुक्त ठरू शकेल, असे अनेकांना वाटते. ईशान्य फ्रान्समधील जमिनीखाली सापडलेला हा खजिना सफेद हायड्रोजनचा आहे. त्याला ‘गोल्डन हायड्रोजन’ असेही म्हटले जाते. हे नैसर्गिकरीत्या आढळणारे आण्विक हायड्रोजन आहे. फ्रान्सच्या नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्चमधील दोन संशोधक जॅक्स पिरोनोन आणि फिलिप डी डोनाटो यांनी हा सफेद हायड्रोजन शोधला.

हे दोन संशोधक जमिनीखाली जीवाश्म इंधनाचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना हा खजिना सापडेल जो हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव नव्हती. या दोघांनी ईशान्य फ्रान्समध्ये लोरेन खाणीत मिथेनच्या स्तराबाबत संशोधन सुरू केले होते. हा मिथेन पाण्यात मिसळलेल्या वायूंचे विश्लेषण करण्यास सक्षम असतो. त्याचवेळी संशोधकांना तिथे व्हाईट हायड्रोजन असल्याचा छडा लागला. जमिनीत काही शेकडा मीटर खाली हायड्रोजनचे काही प्रमाण असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक संशोधन होत गेले तसे त्याचे महत्त्व समजत गेले. 1100 मीटर खोलीवर ते 14 टक्के आणि 1250 मीटर खोलीवर ते 20 टक्के होते. पिरोनोन यांनी सांगितले की हे आश्चर्यजनक होते.

हायड्रोजनच्या एका मोठ्या भांडाराचे संकेत यामुळे मिळाले. आमचे अनुमान आहे की याठिकाणी 60 लाख ते 250 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन असू शकतो. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सफेद हायड्रोजनच्या सर्वात मोठ्या भांडारापैकी हा एक असू शकतो. व्हाईट हायड्रोजन हा जियोलेजिक हायड्रोजन म्हणूनही ओळखला जातो. तो नैसर्गिकरीत्या निर्माण होतो आणि हवामानासाठी उपयुक्त असतो. तो प्रयोगशाळेत किंवा उद्योगांमध्ये निर्माण होणार्‍या हायड्रोजनपेक्षा वेगळा असतो.

करडे किंवा काळे हायड्रोजन हे जीवाश्म स्रोतांपासून निर्माण होतात. या हायड्रोजनची निर्मिती होत असताना कार्बन डायऑक्साईड निघतो व अन्यही काही ग्रीनहाऊस वायूंची निर्मिती होते. अर्थातच ते पर्यावरणासाठी हानिकारक ठरते. मात्र, व्हाईट हायड्रोजनपासून प्रदूषण होत नाही व तो रिसायकेबल आहे. त्यामुळे त्याला ‘व्हाईट’ किंवा ‘सफेद’ म्हटले जाते. त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण ऊर्जास्रोत बनण्याची क्षमता असते.

Back to top button