इस्रायलपुढे आव्हान भुयारांचे | पुढारी

इस्रायलपुढे आव्हान भुयारांचे

हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

हमासच्या प्रत्युत्तराची दखल घेत आता इस्रायलने अंतिम इशारा दिला असून इस्रायल गाझावर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. परंतु, हमासच्या भुयारांच्या नेटवर्कमुळे इस्रायली लष्कराच्या तंत्रज्ञानाची आणि गुप्तचर यंत्रणेची ताकदही अपुरी पडत आहे. हमासला या बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये दारूगोळा भरण्यासाठी खूप वेळ मिळाला आहे. ते इस्रायली सैनिकांना बोगद्यात घुसायला देऊन स्फोट घडवून आणण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे इस्रायलच्या जमिनी हल्ल्याला यश मिळण्यात आणि हमासला उद्ध्वस्त करण्यासाठी गाझातील भुयारे हा मोठा अडथळा आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमासने केलेल्या निर्घृण हल्ल्यानंतर इस्रायलने पुकारलेले युद्ध अद्यापही धगधगते आहे आणि आता ते नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. आतापर्यंत या युद्धसंघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली आहे. इस्रायल हा देश सामरिकद़ृष्ट्या पुढारलेला आणि प्रगत असला तरी हमासकडूनही इस्रायलवर जोरदार हल्ले होत आहेत. हिजबुल्लाहही इस्रायलला लक्ष्य करत आहे. त्यामुळे गाझापट्टीवरील तणाव आणि आक्रोश दिवसागणिक वाढत आहे. हमासच्या प्रत्युत्तराची दखल घेत आता इस्रायलने अंतिम इशारा दिला असून इस्रायल गाझावर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. लष्करी हल्ल्यासाठी इस्रायलने गाझा सीमेजवळ एक लाख 60 हजार पेक्षा अधिक सशस्त्र सैन्यांसह तीन लाख राखीव सैन्यांनाही सज्ज केले आहे. परंतु, गाझाच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात लष्कर पाठवणे ही अतिशय धोकादायक मोहीम ठरू शकते. जमिनीवरील संभाव्य हल्ला किती मोठा असेल, म्हणजेच लष्कर शहराच्या किती आतमध्ये जाईल आणि किती काळासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण इस्रायलने गाझातील पॅलेस्टिनींना दक्षिणेतून पळून जाण्याचा दिलेला इशारा हा त्यांच्या लष्करी कारवाईचा पुढील टप्पा जवळ येत असल्याचे संकेत देणारा आहे.

स्वतःचा प्रदेश सुरक्षित करणे हे इस्रायलसमोरील पहिले आव्हान आहे आणि ज्यांनी सीमा ओलांडून 1300 हून अधिक लोकांना मारले आणि 150 जणांना ओलिस ठेवले. अशा हमासच्या हल्लेखोरांना मारणे किंवा पकडणे हे दुसरे आव्हान आहे. मिनी गाझा म्हणून ओळखल्या जाणार्‍या दक्षिणेकडील लाखो-कोटी डॉलर्सच्या शहरी युद्धकेंद्रात याबाबत इस्रायली सैन्याला प्रशिक्षण दिले जात आहे. तिथे त्यांना दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आणि भुयारांच्या चक्रव्यूहांचा सामना करत कसे लढायचे याचे धडे दिले जातात.

हमासने 1 हजारहून पेक्षा अधिक इमारती आणि भुयारे बांधली आहेत. उद्देश साध्य करण्यासाठी लष्कराच्या विशेष तुकड्यांना सज्ज केले गेले आहे. रणगाडे आणि शस्त्रास्त्रांसोबतच सशस्त्र बुलडोझर हाताळणार्‍यांना एकत्र केले आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून हमास वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरातील भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे; जो हमास वापरतो. सध्या इस्रायली लष्कर गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. इथे सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती केवळ हमास आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत; जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील.

सीमापार करण्यासाठी भुयारे मूलभूत असतात. त्यांच्यासाठी कोणतीही तटबंदी नसते आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करणे हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु, गाझाच्या आत असलेल्या भुयारांचा उद्देश वेगळा आहे. हमासला तिथे दीर्घकाळ राहायचे आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात; जेणेकरून तिथे दैनंदिन आयुष्य जगता येईल. तिथे त्यांचे नेते लपून बसतात. त्यांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीमही तिथेच आहे. वाहतुकीशिवाय, कम्युनिकेशनसाठीही या भुयारांचा वापर केला जातो. त्यामध्ये वीज, लाईटची सोय आहे. भुयारे खोदण्यात हमासने नैपुण्य मिळवले असून ही कला ते सीरियातील बंडखोर हल्लेखोरांकडून शिकले.

गाझामधील भुयारे जमिनीपासून 30 मीटर खाली असावीत आणि त्यात प्रवेश करण्यासाठी घरांच्या तळघरांमधून मशिदी, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहूनही भुयारांमध्ये प्रवेश करता येतो, असे सांगितले जाते. इस्रायलचा आरोप आहे की, हमासने गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी दिलेली कोट्यवधींची आंतरराष्ट्रीय मदत भुयारे तयार करण्यासाठी वापरली आहेत. आता झालेल्या हमासच्या हल्ल्यात यापैकी काही भुयारांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. गाझामधील भुयारांच्या नेटवर्कच्या विस्ताराचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे मानले जाते की, ही भुयारे संपूर्ण गाझामध्ये पसरली आहेत. 2021 मध्ये झालेल्या संघर्षानंतर इस्रायली लष्कराने गाझामध्ये पसरलेली 100 कि.मी. लांबीची भुयारे नष्ट केल्याचे सांगितले होते, पण हमासने दावा केला होता की, त्यांनी गाझामध्ये 500 कि.मी. लांबीची भुयारे बांधली आहेत आणि इस्रायलच्या हल्ल्यात केवळ पाच टक्के भुयारे उद्ध्वस्त झाली होती.

2005 मध्ये इस्रायली सैन्याने आणि ज्यू स्थायिकांनी गाझामधून माघार घेतली. त्यानंतर तिथे भुयारे बांधण्याचे काम सुरू झाले. दोन वर्षांनंतर हमासने गाझावर ताबा मिळवला आणि त्यानंतर भुयारांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारू लागले. 2006 मध्ये अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमारेषेखालून जाणार्‍या एका भुयारातून इस्रायलमध्ये घुसून दोन सैनिकांची हत्या केली होती. गिलाड शालित नावाच्या सैनिकाचे अपहरण करून त्याला पाच वर्षे कैदी बनवून ठेवले होते. 2013 मध्ये इस्रायली सैन्याने गाझा पट्टीपासून त्यांच्या एका गावापर्यंत 18 मीटर खोल आणि 1.6 किलोमीटर लांबीचे भुयार शोधले होते. त्याच्या पुढच्या वर्षी इस्रायलने गाझामध्ये घुसून ही भुयारे नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. यात 30 भुयारे उद्ध्वस्त झाली. बोगद्यांची माहिती मिळाल्यास इस्रायली हवाई दल त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करू शकते. थोडक्यात इस्रायलच्या जमिनी हल्ल्याला यश मिळण्यामध्ये आणि हमासला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी गाझा पट्टीतील भुयारे हा सर्वात मोठा अडथळा आहे. शहरातली आणि भुयारामधली लढाईमध्ये दोन्ही बाजूला पुष्कळ नुकसान सहन करावे लागेल आणि ही लढाई कोण केव्हा जिंकेल, हे केवळ येणारा काळच सांगू शकतो.

Back to top button