Pune News : मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट कधी मिळणार? | पुढारी

Pune News : मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट कधी मिळणार?

पुणे : पीएमपीच्या बसगाड्यांमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट यंत्रणा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, अद्याप ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली नाही. या यंत्रणेची पुणेकर प्रवाशांना मोठी उत्सुकता लागलेली असून, आणखी किती दिवस या अ‍ॅपसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न पुणेकर प्रवाशांना पडला आहे. सध्याच्या काळात लाइट बिल, सिनेमा तिकीट, टॅक्सी, कॅब, एसटी महामंडळाचे तिकीट, रस्त्यावरचा वडापाववाला, भाजीवाल्यापासून सर्व पेमेंट मोबाईलद्वारेच देता येते. मात्र, पीएमपीकडून अद्याप अशी यंत्रणा राबविली जात नाही. त्यामुळे पीएमपी खूपच मागे असल्याची चर्चा प्रवाशांकडून केली जात आहे. पीएमपीने नुकतीच ’क्यूआर कोड यूपीआय’ यंत्रणा अमलात आणली आहे. त्यानंतर थेट प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पीएमपी बसचे तिकीट काढता येणार होते. मात्र, या यंत्रणेबाबत पीएमपी अधिकार्‍यांमध्ये अनुत्सुकता पाहायला मिळत आहे.

मेट्रो तिकिटाला कनेक्टिव्हिटी कधी?

मेट्रोतून उतरल्यावर त्याच तिकिटाने पीएमपीमधून प्रवास करता यावा, याकरितासुध्दा पीएमपी प्रशासन नवी यंत्रणा उभी करणार होते. मात्र, मेट्रोचा आता तिसरा टप्पा सुरू होईल. मात्र, तरीसुध्दा पीएमपीकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसत आहे.

मी नुकतीच ई बिक्स कंपनीसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत अत्याधुनिक तिकीट यंत्रणेचा सर्व आढावा घेतला आहे. आमच्याकडील आयटी विभागात रखडलेल्या या सर्व प्रकल्पांना लवकरच गती दिली जाईल. मोबाईल तिकीट यंत्रणासुद्धा सुरू केली जाईल.

संजय कोलते,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

ओला, उबेरच्या टॅक्सी, रिक्षा, ट्रॅव्हल्स बस आणि एसटी बसचे तिकीटसुध्दा सध्या अ‍ॅपद्वारे काढता येत आहे. मात्र, पुण्याची जीवनवाहिनी म्हणविणार्‍या पीएमपीत अशी व्यवस्था का नाही? खरेतर ही सुविधा नसल्याने पीएमपी इतर वाहतूक पुरविणार्‍या यंत्रणांच्या तुलनेत मागेच पडल्याचे दिसते. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी अशी यंत्रणा तत्काळ सुरू करावी तसेच कंडक्टर बसमध्ये क्यूआर कोड मागितल्यावर देत नाहीत, त्यांना याबाबत सक्त सूचना करावी.

– सनी पासलकर, प्रवासी

हेही वाचा

गोव्यात मॉर्निंग वॉक करताना पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Nashik News : किडनीदान करत प्राध्यापक पत्नीने दिले पतीला जीवदान

Pune News : सहीच नाही; पण पालकमंत्री म्हणताहेत ‘कामे लवकर करा’

Back to top button