पृथ्वीभोवती फिरत आहे चंद्राचा तुकडा? | पुढारी

पृथ्वीभोवती फिरत आहे चंद्राचा तुकडा?

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. मात्र केवळ चंद्रच नव्हे तर त्याच्यापासून निघालेला एक तुकडाही पृथ्वीभोवती फिरत आहे असे खगोल शास्त्रज्ञांना वाटते. या ‘चाँद का टुकडा’ बाबत आता नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार ज्याला आतापर्यंत एक लघुग्रह समजले जात होते तो खरे तर चंद्राचाच एक तुकडा असावा याचे काही पुरावे मिळाले आहेत.

या लघुग्रहाला ‘कामोलेवा’ असे नाव देण्यात आले आहे. हे एक हवाई भाषेतील नाव असून त्याचा अर्थ ‘तुकडे’ असा होतो. हा एक चक्राच्या आकाराचा तुकडा असून तो पृथ्वीभोवती 14.4 दशलक्ष किलोमीटरवरील कक्षेतून फिरतो. 2016 मध्ये सर्वप्रथम या लघुग्रहाचा शोध घेण्यात आला. या विचित्र अवकाशीय शिळेबाबत संशोधकही गोंधळात पडले होते. त्याचा उगम कुठे आहे याचा शोध घेतला जात होता. 2021 मध्ये त्याच्या विश्लेषणातून जे समोर आले ते पाहून संशोधक अधिकच आश्चर्यचकित झाले.

या लघुग्रहाची संरचना ही पृथ्वीच्या चंद्राशी मिळतीजुळती आहे. आता याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती ‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्न्मेंट’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चंद्राचे असे अनेक तुकडे सौरमालिकेत फिरत असावेत असेही संशोधकांना वाटते. अरिझोना युनिव्हर्सिटीतील भारतीय वंशाच्या संशोधिका रेणू मल्होत्रा यांनी याबाबतची माहिती दिली. ‘कामोलेवा’ चा उगम चंद्रामधूनच झाला असावा, असे वाटण्यासारखे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button