समित्यांना मुहूर्त मिळणार | पुढारी

समित्यांना मुहूर्त मिळणार

अनिल देशमुख

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध समित्यांना अखेर मुहूर्त मिळणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक विभागाकडे कोणत्या समित्या कार्यरत आहेत, त्याची रचना, त्यावरील नियुक्त्यांबाबतचे आदेश अशी सर्व माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागवली आहे. ती उपलब्ध होताच, समिती स्थापनेच्या हालचाली गतिमान होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया दीड-दोन महिन्यातं झाली तरी सदस्यांना आठ-दहा महिने काम करण्याची संधी मिळणार आहे.

शासनाच्या विविध विभागांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समिती कार्यरत आहेत. या समितीत अशासकीय सदस्यांचाही समावेश असतो. अशा समितीत सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धडपड सुरू असते. कधी कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून तर कधी कार्यकर्त्यांचे पुनर्वसन म्हणून राजकीय नेत्यांनाही या समित्या महत्त्वाच्या ठरतात. मात्र, प्रत्यक्ष नियुक्ती करताना अनेकदा नेत्यांचीही दमछाक होत असते.

सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर महायुतीने विविध महामंडळांचा फार्म्युला निश्चित केला आहे. त्याच धर्तीवर जिल्हास्तरावरही समित्यांसाठी फॉर्म्युले निश्चित केले जात आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्वच समित्यांवर नियुक्त्या करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात किती समित्या आहेत, त्यावर कोणाची नियुक्ती करता येते, त्यात महत्त्वाच्या समित्या कोणत्या, कोणत्या पक्षाला किती जागा या सर्वांची गणिते मांडण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेला महिना-दीड महिनाही लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीसाठी प्रयत्नशील

अनेक कार्यकर्त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे नगरसेवकांच्या जागा रिक्त राहणार आहेत.

देवस्थान समितीला मुहूर्त कधी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठीही काहींनी देव पाण्यात घातले आहेत. मात्र, देवस्थान समितीला मुहूर्त कधी मिळणार, हे सांगणे कठीण असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

जुन्या याद्या परत मागवल्या

विशेष कार्यकारी अधिकारी पदासह अन्य समित्यांसाठी यापूर्वी महायुतीतील पक्षाच्या वतीने काही याद्या पाठवल्या होत्या. या याद्या परत मागवण्यात आल्याची चर्चा आहे. महायुतीत आता राष्ट्रवादीचीही भर पडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली जाणार असल्याने या याद्या परत मागवल्या असाव्यात, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button