किरणोत्सव : स्थापत्य-खगोलशास्त्राचा अचूक समन्वय | पुढारी

किरणोत्सव : स्थापत्य-खगोलशास्त्राचा अचूक समन्वय

कोल्हापूर; सागर यादव : मावळतीची सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श करून लुप्त झाली, सोनेरी किरणे मुखापर्यंत पोहोचली, ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवात अडथळा अशा बातम्या कोल्हापूरकरांना वर्षातून दोनवेळा ऐकायला-वाचायला मिळतात. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दरवर्षी जानेवारी व नोव्हेंबर महिन्यात दीपोस्तव साजरा होतो. वास्तुरचना व खगोलशास्त्राचा अचूक समन्वय साधणारा हा किरणोत्सव असतो.

मंदिरांच्या निर्मितीमध्ये योगशास्त्रासह भूगोल, भौतिक, गणित, भूमिती आदी शास्त्रेे, वैज्ञानिक तत्त्वे तसेच गुरुत्वाकर्षण व इतर नियमांचा वापर केलेला आहे. सूर्यकिरणांनुसार रचना हे अनेक मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. काही मंदिरांतील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्योदयाची पहिली किरणे पडतील, अशी वास्तुरचना करण्यात आली आहे. अनेक मंदिरांसमोर लहान-लहान झरोके असतात. यातून कोणत्याही ऋतूत सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात.

कोणार्कचे सूर्यमंदिर, अजंठा-वेरूळ, पुण्याजवळील यवत टेकडीवरील शिवमंदिर, करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा डोंगरावरील मंदिरासह विविध मंदिरे, गडकोट-किल्ले, राजवाड्यांच्या स्थापत्यात सूर्यकिरणांसाठी स्वतंत्र व्यवस्था पाहायला मिळते. वास्तूंची उभारणी करताना पृथ्वीच्या गतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा अचूक अभ्यास केला जातो. सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण प्रारंभावेळी होणारा किरणोत्सव हा पुरातन काळातील प्रगत स्थापत्य आणि खगोल शास्त्राचा एक अभूतपूर्व असा सुरेख संगमच आहे.

मंदिराचा किरणोत्सव कालावधी पाच दिवसांचा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव पाहायला मिळतो. याअंतर्गत पश्चिमेकडील महाद्वारातून येणारी सूर्यास्ताची किरणे मुख्य गरुड मंडपापासून गर्भगृहात 185 मीटर आत असणार्‍या देवीच्या मूर्तीवर पडतात. या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताची किरणे देवीच्या पायापर्यंत, दुसर्‍या दिवशी मध्यापर्यंत आणि तिसर्‍या दिवशी संपूर्ण मूर्तीवर पडतात. किरणोत्सवाच्या काळात सूर्यकिरणांची तीव—ता सरासरी 800 ते 1200 लक्षदरम्यान असते.

पूर्वीपासून अंबाबाईचा किरणोत्सव उत्तरायनाच्या कालखंडात 31 जानेवारी, 1 व 2 फेब—ुवारी आणि दक्षिणायनाच्या कालखंडात 9, 10, 11 नोव्हेंबर या तारखांना झाल्याचे उल्लेख आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने किरणोत्सवाचा खगोलशास्त्रीय अभ्यास करून हा किरणोत्सव तीन नव्हे, तर पाच दिवसांचा असल्याचे सिद्ध झाले आहे.

किरणोत्सव पूर्णक्षमतेने होण्यासाठी वातावरण स्वच्छ असणे अत्यावश्यक असते. वातावरणातील धुळीचे कण, दव, आर्द्रता, बाष्प यांसह विविध प्रकारची वाहने व इतर कारणांनी निर्माण होणारा धूर, धूळ व प्रदूषित घटक, आकाशात निर्माण होणारे ढग यांसह मानवनिर्मित अढथळे दूर होणे अत्यावश्यक असते.
– प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर,
(पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख विवेकानंद कॉलेज)

Back to top button