पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला गोवा सज्ज | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला गोवा सज्ज

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गुरुवारी 26 रोजी संध्याकाळी 6 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत आहेत. पंतप्रधानांच्या स्वागताची सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली असून फातोर्डा येथे या स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्रालयामध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव पुनीत गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात पहिल्यांदाच होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे हे गेले साडेतीन महिने रात्रंदिवस पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून कामे करून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यापूर्वी गोमंतकीय कलाकारांचा कार्यक्रम होईल. तसेच हेमा सरदेसाई व सुखविंदर सिंग यांचे गायन होणार आहे.

उद्घाटनानंतर प्रत्यक्ष मैदानावर सहाशे विविध कला सादर करणार आहेत. 5 हजार विद्यार्थी व 7 हजार नागरिकांना उद्घाटन सत्रात प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेण्यासाठी प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्वांनी संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मैदानात प्रवेश करावा लागेल.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडामंत्री गावडे उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत. 10 हजार क्रीडापटू आणि पाच हजार प्रशिक्षक व इतर सहाय्यक मिळून 15 हजार लोकांच्या राहण्याची, वाहतुकीची व जेवणासह त्यांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष हॉटेलमध्येसुध्दा सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यासाठी राज्याचे सहा क्लस्टर तयार केले असून सहा पोलिस अधीक्षकाकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. खेळाडूंना हॉटेल, जेवण व वाहतूक यांची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली गेली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यामध्ये क्रीडा संस्कृती वाढावी. गोव्यातील युवक युवती खेळाडू म्हणून पुढे याव्यात यासाठी पायाभूत सुविधांसाठी गोवा सरकारने करोडो रुपये खर्च केले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केवळ अर्धा तास वाहतूक बंद ठेवणार

पंतप्रधान दाबोळीत पोचून फातोर्डा येथे येण्यास निघाल्यानंतर केवळ अर्धा तास वेर्णा भागातील वाहतूक बंद ठेवली जाईल. रात्री 8 वाजता पंतप्रधान निघताना अर्धा तास वाहतूक बंद राहील. इतर वेळी या मार्गावरील वाहतूक सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगाव येथील सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना त्या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

24 तास आरोग्य सेवा

कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर त्यांच्यासाठी 24 तास न्युरो सर्जन, आयीयूमध्ये खाटा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणीही आरोग्य उपचारासाठी डॉक्टर तैनात ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

क्रीडानगरीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

कांपाल पणजी येथे उभारण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण क्रीडा नगरीमध्ये 28 पासून संध्याकाळच्या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. गोव्यातील कलाकारांना त्यात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

Back to top button