माळशेज घाट बोगदा, नगर-कल्याण महामार्ग चौपदरीकरणास मंजुरी | पुढारी

माळशेज घाट बोगदा, नगर-कल्याण महामार्ग चौपदरीकरणास मंजुरी

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र तसेच भारतातील अन्य महत्त्वाच्या शहरांना भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी जोडणार्‍या नगर – माळशेज घाट – कल्याण या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. माळशेज घाटातील बोगद्याच्या कामासही मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास व माळशेज घाटातील बोगद्याची दुरुस्ती झाल्यास या महामार्गावरील वाहतूक सुसाट होणार असून, मुंबईला अगदी कमी वेळात पोहोचता येणे शक्य होणार आहे.

संबंधित बातम्या :

प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे तर रघुवर दास ओडिशाचे नवे राज्‍यपाल

केंद्रीय रस्ते आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या वेळी मुरबाडचे (जि. ठाणे) आमदार किसन कथोरे उपस्थित होते. माळशेज घाटातील बोगद्याच्या कामासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नगर – माळशेज – मुरबाडमार्गे कल्याण हा रस्ता दुपदरी आहे, तो चौपदरी झाल्यास अधिक सुविधा निर्माण होईल. सध्या या महामार्गावरून जुन्नर, आळेफाटा, नगर, औरंगाबाद व विदर्भ या भागातील शेतकरी व व्यापारी आपला माल कल्याण, नवी मुंबई, मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील मालाचीही ने-आण केली जाते. हा महामार्ग मुंबई, कोकण, पुणे आणि मराठवाडा व विदर्भाला जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे.

Back to top button