iPhone : दुकानातील सीलबंद आयफोन होणार खोके न उघडताच अपडेट | पुढारी

iPhone : दुकानातील सीलबंद आयफोन होणार खोके न उघडताच अपडेट

सॅन फ्रान्सिस्को, वृत्तसंस्था : सीलबंद खोके न उघडता फोन अपडेट करण्याची यंत्रणा अ‍ॅपल आपल्या आयफोनसाठी आणत असून त्यामुळे अ‍ॅपल स्टोअरमधून घेतलेला कोणताही फोन घेतानाच सिस्टीम अपडेट झालेला असेल व थेट वापरता येईल.

नवीन तंत्रज्ञानाबाबत पॉवर ऑन या नियतकालिकात मार्क जर्मन यांनी अ‍ॅपलच्या या नवीन यंत्रणेची माहिती दिली आहे. कोणताही फोन विकत घेतला तर तो सीलबंद खोके फोडून काढल्यावर सुरू करून आधी सिस्टीम अपडेट करावी लागते. त्यास लागणारा वेळ हा मोबाईल ग्राहकाच्या उत्साहावर पाणी फेरणारा असतो. घेतलेला मोबाईल आधीच्या व्हर्जनचा असेल तर अपडेट करणे भागच असते.

यावर आता अ‍ॅपलने आपल्या आयफोनपुरता तोडगा काढला आहे. त्यानुसार अ‍ॅपलने एक अपडेट पॅड विकसित केले असून ते जगातील सर्व अ‍ॅपल स्टोअर्सना दिले जाणार आहे. तेथे विक्री बाकी असलेल्या सर्व आयफोनची सिस्टीम ताज्या अपडेटने सुसज्ज असणार आहे. या पॅडवर सीलबंद खोक्यासह आयफोन ठेवल्यावर वायरलेस माध्यमातून आतल्या आत मोबाईल सुरू होईल व सारे अपडेट डाऊनलोड करेल व त्यानंतर आपोआप स्वीच ऑफ होईल. आयफोन 14 लाँच झाला. त्यात आयओएस 16 होती. पण आता आयओएस 17 दाखल झाली आहे. त्यामुळे आता अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन 14 घेतला तर तो थेट आयओएस 17 सहितच ग्राहकाला मिळणार आहे.

अ‍ॅपलने विकसित केलेले हे अपडेट पॅड फक्त आणि फक्त अ‍ॅपल स्टोअरपुरतेच असेल. त्याची बाजारात विक्री करण्याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. आपल्या ग्राहकांना कोणताही आयफोन घेतला तरी तो हाती पडताच अपडेट झालेलाच असावा या हेतूने अ‍ॅपलने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Back to top button