कमाल तापमानाची उंच उडी ! मान्सून परतताच 8 ते 10 अंशांनी वाढ | पुढारी

कमाल तापमानाची उंच उडी ! मान्सून परतताच 8 ते 10 अंशांनी वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 50 टक्के भागातून मान्सून माघारी फिरताच अवघ्या 24 तासांत कमाल तापमानात तब्बल 8 ते 10 अंशांनी वाढ झाल्याने ऑक्टोबर हीटचा चटका राज्यभर जाणवू लागला आहे. विदर्भाचे कमाल तापमान 36 अंशांवर, तर उर्वरित भागांचे सरासरी तापमान 34 अंशांवर गेले आहे. महाबळेश्वरचाही पारा 28 अंशांवर गेला आहे.

24 तासांत पावसाची नोंद नाही
सर्वत्र कोरडे वातावरण आहे. गत 24 तासांत राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. 6 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमाल तापमान 24 ते 25 अंशांवर होते.

महाबळेश्वरचाही पारा वाढला
महबळेश्वरचे कमाल तापमान 6 ऑक्टोबरपर्यंत 18 ते 21 अंशांवर होते. मात्र, पाऊस थांबताच त्यात 8 ते 10 अंशांनी वाढ होऊन रविवारी पारा 28 अंशांवर गेला. मात्र, किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होत असून रात्रीच्या वेळी तेथे 15 ते 16 अंश इतके तापमान आहे.

राज्यातील काही शहरांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
अकोला 36.6, अमरावती 35.2, चंद्रपूर 34.8, नागपूर 35, यवतमाळ 35.5, पुणे 33.9, जळगाव 34.4, कोल्हापूर 33.1, नाशिक 33.7, सांगली 33.2, सातारा 33.4, सोलापूर 35.6, छत्रपती संभाजीनगर 33.2, परभणी 35.3, नांदेड 34.8, बीड 31.9, मुंबई 32.

आरोग्य सांभाळा : हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या कमाल तापमानात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असून, तापमानवाढीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले आरोग्य सांभाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button