Asian Games Badminton final : बॅडमिंटनमध्‍ये भारताचा डंका, पुरुष दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी | पुढारी

Asian Games Badminton final : बॅडमिंटनमध्‍ये भारताचा डंका, पुरुष दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत बॅडमिंटनमध्‍ये पुरुष दुहेरीत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्‍यात सात्विकसाई राज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने चमकदार कामगिरी करत कोरियाचा 21-18, 21-16 ने पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. (Asian Games Badminton final)

सात्विक-चिरागने जिंकले सुवर्णपदक

सात्विक-चिराग जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या जोडीने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. सात्विक-चिराग जोडीने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. (Asian Games 2023 Badminton)

मलेशियाचा पराभव करत सात्विक-चिरागची गोल्डन फायनलमध्ये धडक

भारताची बॅडमिंटनमधील स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे. या जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या आरोन चिया टेंग फोंग आणि सोह वुई यिक याचा 2-0 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून गोल्डन फायनलमध्ये दणक्यात धडक मारली.

आशियाई स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15 नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ आणि 11व्या दिवशी 12, तर 12 व्या दिवशी पाच पदके मिळाली आहेत. आज 13 व्या दिवसाचा खेळ सुरू असून  भारताच्या खात्यात एकूण १०१ पदके जमा झाली आहेत. यात २६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे.

हॉकीत टीम इंडियाची ‘गोल्ड’वर मोहर

भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष हॉकी फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. भारताने नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी भारताने इंचॉन येथे 2014 मध्ये पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे चौथे (1966, 1998, 2014 आणि 2023) सुवर्णपदक आहे. तर नऊ रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहेत. शानदार फॉर्मात असलेल्या टीम इंडियाने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंग 2 तर मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, अभिषेक यांनी गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला. जपानसाठी सेरेन तनाका याने एकमेव गोल केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले, मात्र गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरच्या 25व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. मनप्रीत सिंगने रिव्हर्स हिटवर गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवली.

तिसऱ्या क्वार्टरच्या 32व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली. यानंतर 36व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी 3-0 ने वाढवली.

यानंतर चौथ्या क्वार्टरमध्येही भारताने दोन गोल केले. 48व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम मैदानी गोल केला. मात्र, सेरेन तनाकाने 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत स्कोअर 4-1 असा केला. त्यानंतर हरमनप्रीतने सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर उत्कृष्ट गोल करत भारताला 5-1 असा शानदार विजय मिळवून दिला.

ग्रुप स्टेजमध्ये भारताने 58 गोल केले आणि फक्त 5 स्विकारले. या आशियाई स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. तर ग्रुप स्टेजमध्ये भारताने जपानचा 4-2 असा पराभव केला होता. दोन्ही संघ 2013 पासून आतापर्यंत 28 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 23 सामने भारताने जिंकले आहेत. तर जपानने तीन सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले. (Asian Games Badminton final)

भारतीय संघाला ब्रिजमध्ये रौप्यपदक

भारतीय संघाने ब्रिजमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. जग्गी शिवदासानी, राजेश्वर तिवारी, संदीप ठकराल, राजू तोलानी, अजय खरे आणि सुमित मुखर्जी यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत रौप्यपदकावर मोहोर उमटवली.

कुस्तीत अमन सेहरावतला कांस्यपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कुस्तीमध्ये भारताला आज सलग तिसरे कांस्यपदक मिळाले आहे. पुरुषांच्या कुस्तीमध्ये अमन सेहरावतने 57 किलो वजनी गटात चीनच्या कुस्तीपटूचा पराभव करून कांस्यपदकाला गवसणी घातली. सेहरावतने या लढतीत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूचा 11-0 च्या गुण फरकाने पराभव केला. (Asian Games Badminton final)

किरण बिश्नोईची कांस्यपदकावर मोहोर

कुस्तीमध्ये किरण बिश्नोईने महिलांच्या 76 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. तिने मंगोलियाच्या मंगोलियन कुस्तीपटू अरिउंजर्गल गणबत हिला 6-3 अशा गुण फरकाने आस्मान दाखवले.

महिला कुस्तीत कांस्यपदक

कुस्तीमध्ये सोनम मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. तिने चीनच्या लाँग जियाला 7 विरुद्ध 5 गुण फरकाने मात देऊन पदकाला गवसणी घातली. 0-3 ने पिछाडीवर पडल्यानंतर चीनच्या कुस्तीपटूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र सोनम मलिकने वर्चस्व राखले. चीनच्या प्रशिक्षकाने शेवटच्या संधीचा रेफरल घेतला जो चुकीचा ठरला. याचबरोबर सोनम कांस्य जिंकण्यात यशस्वी झाली. महिला किस्तीमधील हे दुसरे पदक आहे. काल (दि. 5 ऑक्टोबर) अंतिम पंघालने पहिले पदक जिंकले होते. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची 100 पदके निश्चित झाली आहेत. नऊ भारतीय खेळाडूंनी विविध खेळांमध्ये आपली पदके निश्चित केली आहेत.

हेही  वाचा :

Back to top button