IND vs AFG Final : भारत- अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा खोळंबा | पुढारी

IND vs AFG Final : भारत- अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा खोळंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगला देशचा दारुण पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे. आज सुरू असलेल्या फायनलमध्ये भारत अफगाणिस्तानला धूळ चारून सुवर्णपदक पटकावणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पावसामुळे सामना थांबला

हँगझोऊमध्ये सुरू असलेला भारत आणि अफगाणिस्तानचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. सामना थांबला तेव्हा अफगाणिस्तान संघाने १८.२ षटकात ५ विकेट गमावत ११२ धावा केल्या होत्या. शाहीदुल्ला कमाल (४९) आणि गुलबदिन नायब (२७) नाबाद आहेत.

या सामन्यात भारतीय कर्णधार गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांची पहिली विकेट ९ चेंडूंवरच पडली. यानंतर अफगाणिस्तान नियमित अंतराने विकेटस् गमावत राहिला. शिवम दुबेने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने झुबैद अकबरीला बाद केले. झुबैदने आठ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्या. अर्शदीप सिंगने त्याचा झेल घेतला. अर्शदीप सिंगने अफगाणिस्तानची दुसरी विकेट घेतली. त्याने मोहम्मद शहजादला यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले. शहजादने सहा चेंडूत चार धावा केल्या. अफगाणिस्तानने तीन षटकांत दोन गडी बाद १० धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला तिसरा धक्का नूर अली जद्रानच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अली धावबाद झाला. त्याने चार चेंडूत एक धाव घेतली. रवी बिश्नोईने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने १० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अफसर झाझाईला क्लीन बोल्ड केले. अफसरने २० चेंडूत १५ धावा केल्या.  १० षटकानंतर अफगाणिस्तानची धावसंख्या ४ गडी बाद ५० धावा अशी होती. शाहबाज अहमदने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने १० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जनातला क्लीन बोल्ड केले. जनातने पाच चेंडूत एक धाव घेतली. १५ षटकानंतर अफगाणिस्तानची धावसंख्या ५ गडी गमावून ८६ धावा होती.

अफगाणिस्तान प्लेइंग ११ : झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद, नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदिन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, जहिर खान

भारत प्लेइंग ११: यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), टिळक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग

Back to top button