‘गोकुळ’चा दूध खरेदी दर इतरांच्या तुलनेत जादाच : योगेश गोडबोले | पुढारी

‘गोकुळ’चा दूध खरेदी दर इतरांच्या तुलनेत जादाच : योगेश गोडबोले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  काही खासगी संस्था दूध उत्पादकांना जादा दराच्या आकडेवारीचे आमिष दाखवत दूध उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘गोकुळ’चा दूध खरेदी दर हा इतरांच्या तुलनेत नेहमीच जादा राहिला आहे. यामुळे दूध उत्पादकांची गोकुळला साथ कायम राहील, असा विश्वास गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी व्यक्त केला.

गोकुळने संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. फॅटनुसार दीड रुपये व एक रुपये अशी ही वाढ आहे. याबाबत दूध उत्पादकांमध्ये संभ—मावस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे; परंतु गोकुळने केलेली म्हैस दूध खरेदी दरवाढ 1 रुपये 50 पैसे व वार्षिक म्हैस दूध दर फरक 2 रुपये 25 पैसे असे एकूण 3 रुपये 75 पैसे दर दूध उत्पादकांना मिळणार आहेत. इतर दूध संघाच्या तुलनेत गोकुळ दूध संघाचा हा दर जादाच आहे. नियम, अटी न लावता गोकुळने दरवाढ केली आहे.

दूध वाढीसाठी गोकुळने दूध उत्पादकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोकुळ सतत दूध उत्पादकांच्या पाठीशी उभा आहे. सध्या काही खासगी संस्था दूध उत्पादकांना जादा दराचे आकडेवारी सांगत आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु गोकुळचा दूध उत्पादक त्याला दाद देणार नाही. त्यांचा गोकुळवरील विश्वास व साथ कायम राहील. म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्री दरात गोकुळने कोणतीही दरवाढ न करता नेहमीच दूध ग्राहकांचेही हित जोपासले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button