स्टेशनवर अचानक कुत्र्यासारखे भुंकू लागले लोक! | पुढारी

स्टेशनवर अचानक कुत्र्यासारखे भुंकू लागले लोक!

बर्लिन : जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात. मात्र एका जागी सुमारे हजारभर लोक एकत्र येऊन ते अचानक विचित्र प्रकार करू लागले तर कुणीही थक्क होऊन जाईल. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये असाच प्रकार घडला. तेथील पॉट्सडॅमर प्लात्ज रेल्वे स्टेशनवर सुमारे एक हजार लोक गोळा झाले आणि ते चक्क कुत्र्यासारखे भुंकू लागले व कुत्र्यांसारख्याच हालचालीही करू लागले! एकमेकांशी ते भुंकूनच बातचितही करीत असल्याचे द़ृश्य दिसून आले. या घटनेचा एक व्हिडीओही आता सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

हा सर्व काय प्रकार आहे असा लोकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेवेळी संबंधित सर्व लोकांनी चेहर्‍यावर कुत्र्याचा मुखवटाही लावला होता. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘कॅनिन बीईंग्ज’ नावाच्या एका समूहाने गेल्या मंगळवारी मध्य बर्लिनमधील या रेल्वे स्टेशनवर बैठक आयोजित केली होती. त्यासाठी हे लोक गोळा झाले होते. हे असे लोक आहेत जे स्वतःला माणूस नव्हे तर कुत्रा समजतात. अशा लोकांच्या हक्कांसाठी हे लोक एकत्र आले होते व भुंकून भुंकून आपला आवाज उठवत होते!

या लोकांना आपण माणूस आहे असे वाटतच नाही, त्यांना आपण एखादे श्वानच आहे असे वाटते. अशी भावना असणार्‍या लोकांचेही काही हक्क आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. जपानमध्येही अशीच भावना असणार्‍या एका माणसाने लाखो रुपये खर्च करून कुत्र्यासारखा पोशाख बनवून घेतला होता. हा पोशाख घालून तो स्वतःला कुत्रा म्हणवून घेत होता. अशा रूपातच आपल्याला बरे वाटते असे त्याचे म्हणणे आहे!

Back to top button