नाणे घाटात पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू | पुढारी

नाणे घाटात पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा :  नाणे घाट परिसरात फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री घडली. या दुर्घटनेत बडोदा (गुजरात) येथील संजय बालमुकुंद केडीया (वय 42) यांचा मृत्यू झाला. गुजरात येथील संजय केडीया, अंकुश अगरवाल, उमेश गोणे हे तिघे मित्र पुण्यातील प्रकाश बैगानी (वाकड) यांच्याकडे आले होते. त्यांच्या वाहनातून ते नाणे घाटात वर्षाविहारासाठी आले. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ते हॉटेलमागे असलेल्या ओढ्यात अंघोळीसाठी उतरले.

त्या वेळी प्रकाश लवकरच पाण्याबाहेर आला व इतर तिघे पाण्यात डुंबत होते. पाणी जास्त खोल नव्हते; मात्र काही क्षणात पाण्याची पातळी अचानक वाढली व तिघे प्रवाहासोबत वाहू लागले. त्यातील दोघे कसेतरी किनारी आले. मात्र, संजय पाण्यात दिसेनासा झाला. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्यामुळे पोलिसांमार्फत जुन्नर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमच्या प्रयत्नानंतर रात्री दीडच्या सुमारास संजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या वेळी रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, संकेत बोंबले, लखन डाडर, धनंजय मिरगुंडे, मगदूम सय्यद, आबेद सय्यद आदींनी संजयचा मृतदेह शोधून काढला.

Back to top button