50 हजार वर्षांपूर्वीचा मनुष्य! सारी ‘एआय’ची कमाल! | पुढारी

50 हजार वर्षांपूर्वीचा मनुष्य! सारी ‘एआय’ची कमाल!

सॅन फ्रॅन्सिस्को : जगभरात तंत्रज्ञानाने आजवर बरीच प्रगती केली आहे. एखादेच असे क्षेत्र असेल, जिथे तंत्रज्ञान अस्तित्वात नसेल. मागील काही कालावधीपासून आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे तर जणू जगरहाटीच बदलून गेली आहे. आर्टिफिशियल इंटलिजेन्समुळे आता आपण पन्नास हजार वर्षांपूर्वीची एखादी व्यक्ती कशी दिसत असेल, याचे कल्पनाचित्रही उभे करू शकतो. याच धर्तीवर असेच एक कल्पनाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अगदी अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून पन्नास हजार वर्षांपूर्वीची व्यक्ती कशी दिसत असेल, हे आजमावून पाहण्यात आले आणि त्यानंतर वेगळेच चित्र समोर आले. मनुष्य त्यावेळी कसा दिसत असेल, हे आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे काही प्रमाणात सुस्पष्ट होऊ शकले. यातून हॉबिट कसे दिसू शकले असते, हे दर्शवण्यात आले. हॉबिटला आज कल्पनेतील पात्र मानले जाते. मात्र, त्यावर अनेक कथा, कादंबरी, चित्रपट साकारले गेले आहेत. हॉबिट हे मनुष्य व वानर यांचे कॉम्बिनेशन होते, असेही म्हटले जाते. आता त्यांना पाहिले कोणीच नाही. पण, प्रत्येक पिढीत त्यांच्या चर्चा रंगत आल्या आहेत. नॅशनल हिस्ट्री म्युझियमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या स्पेसिज खूप छोट्या होत्या. त्यांचे पाय छोटे व तळवे मोठे होते. त्यांच्या आहाराची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण, ते मांस खायचे, असे मानले जाते. त्यांचे कल्पनाचित्र सोशल मीडियावर पोस्ट होताच पाहता पाहता ते व्हायरल झाले आणि ते आणखी एकदा चर्चेत आले.

Back to top button