Pimpri News : ते मृत्यू डेंग्यूचे नव्हे डेंग्यूसदृश्य; महापालिका वैद्यकीय विभागाचे स्पष्टीकरण | पुढारी

Pimpri News : ते मृत्यू डेंग्यूचे नव्हे डेंग्यूसदृश्य; महापालिका वैद्यकीय विभागाचे स्पष्टीकरण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : डेंग्यूसदृश्य आजारामुळे चिखली-जाधववाडी येथील दोन मुलींचा नुकताच उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यातील एका मुलीचा महापालिकेच्या पुणे येथील खासगी रुग्णालयात तर, दुसर्‍या मुलीचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन मुलींपैकी एका पाच वर्षाच्या मुलीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात 13 ते 18 तारखेदरम्यान उपचार सुरु होते.

18 तारखेला त्यांना तेथून महापालिकेच्या पिंपरी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री एक ते दीडच्या दरम्यान म्हणजेच 19 तारखेला उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. डॉ. वाबळे म्हणाले, संबंधित मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे कोणतेही कन्फर्म रिपोर्ट नव्हते. दरम्यान, चिखली-जाधववाडी येथील दुसर्‍या 10 वर्षाच्या मुलीला 4 तारखेला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

निष्काळजीपणाबद्दल चौकशी करा

चिखली-जाधववाडी येथील दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना लक्षात घेता महापालिका प्रशासना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात कमी पडले आहे. परिसरात धूर आणि औषध फवारणी करणे अपेक्षित होते. त्यामुळे महापालिका वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. त्याबाबत संबंधित विभागप्रमुखांची चौकशी करुन त्यांच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य अ‍ॅड. सागर चरण
यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

दोन्ही मुलींचा मृत्यू डेंग्यूसदृश्य आजाराने झालेला आहे. डेंग्यू बाधित असल्याबाबत पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेला नाही. एका मुलीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात तर, दुसर्‍या मुलीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत सांगता येईल.

– डॉ. लक्ष्मण गोफणे,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

हेही वाचा

Pimpri News : विसर्जन घाटांवर वैद्यकीय, अग्नीशमन पथक तैनात

Pimpri news : नोकर भरतीतील उत्तीर्ण उमेदवार15 ऑक्टोबरपर्यंत रूजू होणार

परभणी : जिंतूर बसस्थानक परिसरातील तो खून पैशाच्या लुटमारीतूनच; तिघांना जेरबंद

Back to top button